इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
शांत व सुसंस्कृत असल्याचा मुखवटा परिधान केलेल्या आ. जयंत पाटील यांचा खरा चेहरा माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी जनतेसमोर आणला आहे. कुटिल व सुडाचे राजकारण करून जिल्ह्यातील विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करणार्या आ. जयंत पाटील यांचे खुनशी प्रवृत्तीचे राजकारण सामान्य जनतेच्या पाठबळावर नष्ट करू, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला. जयंत पाटील यांच्या दबावाखाली प्रकाश रुग्णालय व डॉक्टरांवर खोटे गुन्हे दाखल करणार्या पोलिस अधिकार्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्याला वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या अनेक सुसंस्कृत व विकासाचे राजकारण करणार्या नेत्यांचा वारसा आहे. या नेत्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. वैचारिक मतभेद असले तरी, ते निवडणुका झाल्या की संपून जायचे. विरोधकांच्या चांगल्या गोष्टींना वसंतदादांसारखे नेते पाठिंबाही द्यायचे. अशा सुसंस्कृत नेत्यांच्या जिल्ह्यात आ. जयंत पाटील हे खुनशी वृत्तीचे राजकारण करीत आहेत. जिल्ह्यात आपल्याला विरोधकच राहू नये, ही त्यांची भावना आहे. जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्यांनी त्रास दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
ते म्हणाले, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी जयंत पाटील यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणला आहे. विरोधकांनी कष्टातून उभ्या केलेल्या संस्था, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारा नेता वाळवा तालुक्यात जन्माला आला हे दुर्दैव आहे. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीने उभ्या केलेल्या संस्था अडचणीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कोरोना काळात मंत्रीपदाचा गैरवापर करून माझ्या कुटुंबासह रुग्णालयातील डॉक्टर व संचालकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास त्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता.
यापुढील काळात सामान्य जनतेने पाठबळ दिल्यास मी आ. जयंत पाटील यांचे खुनशी प्रवृत्तीचे व द्वेषाचे राजकारण मोडून काढेन. ही खलनायकी दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी तालुक्यातील जनतेने पाठिंबा द्यावा. जयंत पाटील यांच्या दबावामुळे आमच्या संस्थेवर व कर्मचार्यांवर खोटे गुन्हे दाखल करणार्या पोलिस अधिकार्यांविरोधात कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील, धैर्यशील मोरे, अशोक खोत, मधुकर हुबाले, चंद्रकांत पाटील, अजित पाटील, यदुराज थोरात, दत्तात्रय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, वसंतदादा व लोकनेते राजारामबापू यांच्या निधनानंतर त्यांच्यातील राजकीय मतभेद संपायला हवे होते. मात्र, जयंत पाटील यांनी दादांच्या तिसर्या पिढीपर्यंत हे सुडाचे राजकारण सुरू ठेवले आहे. प्रकाशबापू, प्रतीक पाटील, विशाल पाटील यांच्याबरोबरच आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील, संभाजी पवार व त्यांचे दोन्ही पुत्र, राजेंद्रअण्णा देशमुख, संग्राम देशमुख अशा जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्रास देऊन त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जिल्ह्यात आपला विरोधकच राहू नये, ही त्यांची प्रवृत्ती आहे. जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता हे त्यांचे कुटिल राजकारण नक्की संपवेल.