विटा - येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अॅड. बाबासाहेब मुळीक सोबत किसनराव जानकर आणि अॅड. संदीप मुळीक. Pudhari Photo
सांगली

महाविकास आघाडीत खानापूर' बाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही : अॅड. मुळीक

करण शिंदे

विटा : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील महाविकास आघाडी मध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष किंवा काँग्रेस यापैकी कोणी लढवावा याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी गुगली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष अॕड. बाबासाहेब मुळीक यांनी टाकली आहे. त्यामुळे तुतारी फुंकण्यासाठी इच्छुक दोन्ही माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह सारेच आवाक झाले आहेत. पुण्यात परवा मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विधानसभेसाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यात खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण सहा जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यांत राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील तर भाजप मधील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे उमेदवा रीची मागणी केली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतली धुसफूस समोर आली असली तरी मुळात खानापूर मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये नेमका कोण लढविणार याबाबत निर्णयच झालेला नाही, असे आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॕड. बाबासाहेब मुळीक यांनी निदर्शनास आणले आहे.

ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षाला ती जागा सोडली जाईल हा आगामी विधानसभेसाठीचा महायुती आणि महाविकास आघाडीचा एकच निकष ग्राह्य मानला तर खानापूर मतदार संघ हा शिवसेना ठाकरे गटा कडे आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माजी आमदार राजेंद्रअण्णा, माजी आमदार सदाभाऊ पाटील आणि अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील या तिघांची खानापूर मतदार संघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदारी केली आहे. देशमुख आणि पाटील दोन्ही गटांकडून उमेदवारी आपल्यालाच याबद्दल दावे प्रतिदावे केले जात आहेत. तिकडे आटपाडीत राजेंद्र अण्णा देशमुख यांची निवडणुकीच्या दृष्टीने सर्व ती तयारी पूर्ण झाली आहे तर इकडे पाटील गटामध्ये माजी आमदार सदाभाऊ पाटील आणि वैभव पाटील या या दोघांनीही आता नाही तर कधीच नाही अशा पद्धतीने महायुती ला रोखण्यासाठी व्यूहरचना केली आहे. या मतदारसंघात माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना शरद पवारांनीच ग्रीन सिग्नल देऊन त्यांना कामाला लागा असे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे.

मात्र याबाबत अॕड. मुळीक म्हणाले की, आज आमच्या पक्षाची बैठक पार पडली यात विधानसभे बाबतच्या घडामोडींचा विषय होता. मुंबईत सात, आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीत अंतर्गत जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली. सांगली जिल्ह्यातील खानापूर मिरज आणि सांगली या तीन जागां बाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. परवा उमेदवारी संदर्भात झालेल्या मुलाखतीमध्ये आटपाडीतून सात जण आणि खानापूर तालुक्यातील दोघेजण इच्छुक आहेत.यांत आटपाडीतून रावसाहेब पाटील, सादिक खाटीक, आनंदराव पाटील नारायण खर्जे आणि राजेंद्र अण्णा देशमुख,तर खानापूरातून सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांनी मुलाखती दिल्या आहेत. ज्या ठिकाणी एकापेक्षा अनेक उमेदवार आहेत त्या ठिकाणी सर्वांचा समन्वय साधून एकास उमेदवारी दिली जाईल. त्यानंतर जिल्हा काँग्रेस तालुका काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे गट यांच्याशी चर्चा करून निर्णय होईल. कारण शिवसेना ठाकरे गटाकडून संजय विभुते आणि काँग्रेसकडूनही आज दोघाजणांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आम्हालाच सुटला आणि अमुकच एकाची उमेदवारी फायनल झाली आहे या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. दरम्यान, हरियाणातील भाजपच्या विजयाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. तसेच सध्या महायुती सरकार कडून लोकानुनय करणाऱ्या, जो जे वांच्छेल तो ते लाहो प्रकार च्या सगळ्या घोषणा या केवळ निवडणुकीच्या मतांसाठीच आहेत हे लोकांना कळले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लोक त्यांना भुलणार नाहीत. महायुती १०० जागा सुद्धा जिंकू शकणार नाही असा दावाही अॕड. मुळीक यांनी केला आहे. यावेळी अॕड. संदीप मुळीक आणि पक्षाचे तालुकाध्यक्ष किसनराव जानकर उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT