Parents and villagers of Nagewadi locked the school
नागेवाडी येथील पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला कुलुप लावले.  Pudhari File Photo
सांगली

तासगाव : नागेवाडीत शिक्षक मागणीसाठी शाळेला ठोकले टाळे

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : दोन शिक्षक असलेल्या शाळेतील एक शिक्षक कायम गैरहजर तर दुसरा शासकीय कामात व्यस्त या प्रकाराला वैतागून शुक्रवारी (दि २६) नागेवाडी (ता. तासगाव) येथील पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला कुलुप लावले. तीन तास विद्यार्थी शाळेच्या दारात बसले आहे हे कळल्यानंतर तहसिलदार रविंद्र रांजणे यांनी सोमवारी शाळेला शिक्षक मिळवून देण्याची ग्वाही दिली. यानंतर कुलुप काढून वर्ग सुरु करण्यात आले.

पालक, ग्रामस्थांनी शाळेच्या गेटलाच लावले कुलूप

नागेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे पहिली ते चवथीचे वर्ग भरतात. शाळेत २४ मुले-मुली असून दोन शिक्षक आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षात दोनपैकी एक शिक्षक सतत गैरहजर होते. यंदा शाळा सुरु झालेपासूनही एकच शिक्षक हजर असतात. तर दुस-या शिक्षकांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. गुरुवारी दिवसभर शिक्षकाविना शाळा सुरु होती. याबाबत विचारणा केली असता प्रशासकीय कामासाठी शिक्षक तासगावात होते असे सांगण्यात आले. मगं वैतागलेल्या पालक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या गेटलाच कुलूप लावले. याची माहिती शिक्षक सचिन वाकडे यांनी शिक्षण विभागाला दिली.

तीन तासानंतर शिक्षण विभागाला आली जाग

शाळा बंद केल्यानंतर तब्बल तीन तास शिक्षण विभागाला जाग आली नाही. वरिष्ठांकडून फक्त थातूरमातूर उत्तरे देण्याचे काम सुरु होते. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिली. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी याबाबतीत निर्देश दिल्यानंतर मात्र शिक्षण विभागाला जाग आली. नागेवाडीत शाळेला टाळे ठोकल्याची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली. याबाबतीत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. सोमवारी शिक्षक देण्याचे आश्वासन मिळालेनंतर वर्ग सुरु करण्यात आले.

तहसिलदारांतील शिक्षक झाला जागा

नागेवाडी येथील शाळेला टाळे ठोकल्यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी तहसिलदार रविंद्र रांजणे यांना याची माहिती दिली. सदर प्रकाराशी कांही संबंध नसताना तहसिलदार रविंद्र रांजणे यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. सोमवारी शिक्षक देण्याचे आश्वासन त्यांच्याकडून घेतले. यानंतर संजय पाटील यांच्याशी संपर्क साधून सोमवारी शिक्षक देण्याची ग्वाही देऊन शाळा उघडण्याची विनंती केली. त्याला मान देऊन शाळेचे कुलूप काढून वर्ग सुरु करण्यात आले. याबाबत विचारणा केली असता तहसिलदार रांजणे म्हणाले, घटनेशी माझा थेट संबंध नाही, परंतू मी पण अगोदर शिक्षकच होतो. हे समजताच माझ्यातील शिक्षक जागा झाला म्हणून मी पुढाकार घेतला.

विस्तार अधिका-यांचे बेजबाबदार उत्तर

शाळेला कुलूप ठोकलेनंतर माजी सभापती संजय पाटील यांनी याबाबतची माहिती देण्यासाठी शिक्षण विस्तार अधिका-यांना फोन केला. तीन तासापासून सर्व मुले बाहेर उभी आहेत, कांहीतरी निर्णय घ्या अशी विनंती केली. परंतू त्यांनी मात्र अत्यंत बेजबाबदार उत्तर दिले. आज दवाखान्यात आलो आहे, वरिष्ठांना कल्पना देतो आणि आपण उद्या कांहीतरी निर्णय घेऊया, असे सांगितले.

SCROLL FOR NEXT