मिरज : दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण, पश्चिम रेल्वेकडून म्हैसूर दरभंगा-म्हैसूर यादरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेच्या दोन्ही दिशांनी प्रत्येकी पाच फेऱ्या होणार आहेत. म्हैसूरहून दरभंगाकडे जाणारी रेल्वे २७ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत, तर दरभंगाहून म्हैसूरकडे येणारी रेल्वे ३१ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे. या रेल्वेमुळे दिवाळी आणि छटपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, मिरज, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
दिवाळी आणि छटपूजेच्या काळात दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांवरील गर्दी वाढत असून, प्रवाशांना आरक्षण मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हैसूर-दरभंगा रेल्वेला एकूण २४ डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
मिरजेत दुपारी, पुण्यात सायंकाळी म्हैसूर जंक्शनवरून ही विशेष रेल्वे रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे. प्रवासादरम्यान दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी ही गाडी मिरज जंक्शनवर पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी पुणे जंक्शन येथे पोहोचून पुढील प्रवास करेल. तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी दरभंगा जंक्शन येथे पोहोचण्याचे नियोजन आहे.
परतीच्या प्रवासात दरभंगा जंक्शनवरून ही गाडी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे. पुणे जंक्शन येथे रात्री १० वाजता, तर मिरज जंक्शन येथे मध्यरात्री ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी म्हैसूर जंक्शन येथे पोहोचेल.
दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत अनेक स्थानकांवर थांबे या विशेष रेल्वेला कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. म्हैसूर, मंड्या, बेंगळुरू, यशवंतपूर, तुमकूर, दावणगेरे, हावेरी, हुबळी, लोंढा, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, कुडची, मिरज, सांगली, कराड, सातारा आणि पुणे या स्थानकांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सलना, प्रयागराज, मिर्झापूर, दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटणा, बख्तियारपूर, मोकामा, बरौनी, समस्तीपूर व दरभंगा या स्थानकांवरही थांबे दिले आहेत.
मिरज-सांगलीच्या प्रवाशांना होणार लाभ
म्हैसूर-दरभंगा- म्हैसूर विशेष रेल्वेला मिरज आणि सांगली येथे थांबा असल्याने या परिसरातील प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाणाऱ्या तसेच उत्तर भारतातून महाराष्ट्र आणि कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा उपयोग होईल. सणासुदीच्या काळातील प्रवासाची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्याने नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होण्यासही मदत होऊ शकते.