सांगली

Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिता जाधव यांचा विजय निश्चित : आमदार सत्यजित देशमुख

Pune Graduate Constituency Election : शिराळ्यात महायुतीचे शक्तीप्रदर्शन

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव या आपल्या माहेरच्या बहीण आहेत. त्यांना विजयाचा गुलाल लावण्यासाठी सर्वांनी ताकदीने प्रयत्न करायचे आहेत. त्यांचा विजय निश्चित असून, शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठीही कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.

सह्याद्री खरेदी-विक्री संघात आयोजित महायुतीच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते.

आमदार देशमुख पुढे म्हणाले की, डॉ. स्मिता जाधव यांना दिवंगत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. पुढारी परिवाराचे सामाजिक कार्य मोठे असून, पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. स्मिता जाधव यांना निवडून देणे काळाची गरज आहे. त्या पदवीधरांच्या प्रश्नांना नक्कीच योग्य न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्त्रीशक्तीला संधी, पदवीधरांचे प्रश्न सोडवणार : डॉ. स्मिता जाधव

यावेळी बोलताना महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, पदवीधरांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात स्त्रीशक्तीवर विश्वास दाखवत मला संधी दिली आहे. पदवीधरांच्या कौशल्याला वाव देणे, उद्योगपूरक केंद्रे उभारणे आणि करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यावर माझा भर राहील.

माझे माहेर शिराळा तालुक्यात असून पुणे व कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. गेल्या २५ वर्षांत विविध माध्यमांतून समाजोपयोगी काम करताना ‘टोमॅटो एफएम’ आणि ‘कस्तुरी क्लब’च्या माध्यमातून महिलांना सक्षम व्यासपीठ मिळवून दिले आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद लाड यांनीही पाठिंबा दर्शवला असून, सर्वांच्या सहकार्याने हा विजय निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील : आमदार राजन नाईक

मुंबईचे आमदार राजन भाई नाईक म्हणाले की, मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान मतदारांचा मोठा पाठिंबा दिसून येत आहे. डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे दोघेही प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. राज्यातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त जागांवर महायुती बाजी मारेल.

भाजप सरचिटणीस शरद लाड म्हणाले, शिराळा तालुक्यात पदवीधर मतदार नोंदणी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे. कार्यकर्त्यांनी आता मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी पार पाडावी आणि डॉ. स्मिता जाधव यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करावे.

भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन उमेदवारांचे विचार पोहोचवण्याचे आवाहन केले, तर नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी खासदारकी, आमदारकी आणि नगरपंचायतीप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीची विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक सत्यजित पाटील यांनी केले, तर आभार योगेश कुलकर्णी यांनी मानले.

याप्रसंगी विलास काळे, जयराज पाटील, हणमंतराव पाटील, तेजस्वी दुर्गे, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, प्रज्ञाताई पाटील, के. डी. पाटील, बाजीराव पाटील, संचालक विजय पाटील, नगरसेविका सुनीता पाटील, सचिन डांगे, घनश्याम पाटील, धनाजी नरुटे, महेश पाटील, कुलदीप निकम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT