मिरज : बेडग येथे पिकअप अडवून चोरट्यांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून रोकड लुटली.
मिरज : बेडग (ता. मिरज) येथे पुण्यातील दोघा व्यापार्यांची सात लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली. चौघा संशयितांनी मध्यरात्री मालवाहू पिकअप अडवून ही लूट केली. यावेळी संशयितांनी पिकअपवर कोयत्याने हल्ला केला. याप्रकरणी लक्ष्मण सिद्धोजी कदम (रा. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांच्या मार्गावर तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी लक्ष्मण कदम यांचे मुळशी येथे किराणा दुकान आहे. या दुकानात लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ते त्यांच्या दाजींसोबत पुण्याहून कर्नाटकातील विजापूरकडे पिकअपमधून निघाले होते.
दोघेही शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील बेडग ते मंगसुळी रस्त्याने निघाले होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करणार्या चौघांनी आडरस्त्यावर त्यांची पिकअप अडवली. त्यानंतर त्यांना दमदाटी केली. कोयत्याने हल्ला करून पिकअपची काच फोडली. यामुळे भयभीत झालेल्या दोघांनी रोकड असलेली बॅग पिकअपमध्येच ठेवून रस्त्याकडेला असलेल्या शेतात पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी पिकअपमधील सात लाख रुपये असलेली बॅग चोरून पोबारा केला. भयभीत झालेल्या दोघांनी पोलिस मदत केंद्रावर फोन केला.
त्यानंतर मिरजचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सराईत चोरट्यांनी ही जबरी चोरी केली असल्याचा संशय आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक, तर मिरज ग्रामीण पोलिसांची दोन पथके चोरट्यांच्या मागावर रवाना केली आहेत.
दरम्यान, सांगली, सोलापूर, पुणे, विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत.
किराणा सामानासाठी पुण्यातून विजापूरला कशासाठी?
ज्यांची लूट झाली, त्या लक्ष्मण कदम यांचे पुण्यातील मुळशीमध्ये किराणा दुकान आहे. या दुकानात लागणारे साहित्य आणण्यासाठी ते कर्नाटकातील विजापूरला का जात होते? तसेच ते थेट मार्ग असताना बेडग-मंगसुळी या आडमार्गे का जात होते? असेदेखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे दोघे किराणा साहित्यच आणण्यासाठी जात होते का? याचाही तपास पोलिस करीत आहेत.
बेडगजवळ झालेली जबरी चोरी ही सराईत चोरट्यांनी केल्याचा संशय आहे. त्याद़ृष्टीने काहीजणांकडे चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे. पिकअपमधून व्यापारी रोकड घेऊन जात असल्याची माहिती असणार्यांनीच ही लूट केली आहे. त्यामुळे ही टोळी पुण्यातील आहे की स्थानिक, याचादेखील शोध घेतला जात आहे.
चौघांनी पिकअप् अडवून रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्याद़ृष्टीने तपास करण्यात येत आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल.प्रणिल गिल्डा, पोलिस उपअधीक्षक, मिरज