

मिरज : मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात असणार्या एका प्रार्थनास्थळाच्या संरक्षक भिंतीवर नाचल्याच्या कारणातून मिरजेत रविवारी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत एकास ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मिरजेतील तणाव तब्बल चार तासानंतर निवळला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरातून रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लग्नाची वरात निघाली होती. ही वरात ब्राह्मणपुरी परिसरातील एका प्रार्थनास्थळाजवळ पोहोचली असता, वरातीमध्ये नाचणार्या काही तरुणांनी प्रार्थनास्थळाच्या संरक्षक भिंतीवर चढून नाचण्याचा प्रकार केला. त्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी एक गट मिरज शहर पोलिस ठाण्यासमोर तीन तासापासून ठिय्या मारून थांबला होता. अखेर पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी संबंधितास ताब्यात घेतलेे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर मिरजेतील तणाव तब्बल चार तासानंतर निवळला. परंतु या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.