तुकाराम धायगुडे
पलूस : पलूस तालुक्यातील धुमके, इंगळे तलावावर सध्या पक्ष्यांचा जल्लोष असून पक्ष्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर निसर्गरम्य झाला आहे. पक्षीनिरीक्षक, छायाचित्रकारांसाठी हे आकर्षण ठरते आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय आणि पोलिस ठाणे यांच्याशेजारी असलेला हा तलाव आधी केवळ पाण्याचा साठा म्हणून ओळखला जायचा. मात्र गेल्या काही वर्षांत त्याचे रूपांतर निसर्ग पर्यटनस्थळात झाले आहे. तलावाच्या पाणथळ किनाऱ्यावर लाल मानेचा आयबिस, राखाडी बगळा आणि लाल गळ्याची टिटवी, कूट नावाचा पाणथळ पक्षी, लाल मानेचा काळा चिखलगवई, पाणचिऊ, पानकावळा, करकोचा, लाल मानेचा काळा चिखलगवई, बगळा हे पक्षी विशेष आकर्षण ठरत आहेत. योग्य जपणूक केली, तर हा तलाव लवकरच ‘पलूसचे पक्षी उद्यान’ म्हणून राज्यात नावारूपास येईल, अशी अपेक्षा निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.
स्वच्छ पाणी, हिरवीगार झाडे आणि शांत वातावरण या सर्व गोष्टी पक्ष्यांना आकर्षित करतात. त्यामुळे तलावाभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याचे प्रदूषण टाळणे आणि निसर्गाचे संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत पर्यावरणप्रेमी हिम्मतराव मलमे यांनी व्यक्त केले. तलावाची धूप होऊ नये यासाठी देशी झाडे लावणे, पाण्यात शेवाळे सोडणे गरजेचे आहे. प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा अंकलखोप येथील पक्षीप्रेमी डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केली.