Manoj Jarange Patil
सांगली : सांगली जिल्ह्यातील विट्याजवळ मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या गाडीतून जखमी कार्यकर्त्याला विटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांचा ताफा कडेगाव येथून विट्याकडे जात असताना हा अपघात घडला. जखमी कार्यकर्त्यावर सध्या विट्यातील रुग्णालयात उपचार सुरू असून जरांगे पाटील यांनी स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मनोज जरांगे पाटील यांचे तासगाव तालुक्यात सोमवारी गावा-गावांत उत्स्फूर्त व जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतासाठी समाजबांधव उपस्थित होते. महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत जरांगे पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. गव्हाण, वज्रचौंडे, खुजगाव फाटा, बस्तवडे, बलगवडे, मांजर्डे, आरवडे, पुणदी, पाचवा मैल तसेच येळावी येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
कवठेमहांकाळ : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द केल्या नाहीत, असे दाखविण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देऊन पत्र काढायला लावले आणि त्यानंतर त्याची मीडिया ट्रायल सुरू केली. प्रत्यक्षात बावनकुळेंनीच नोंदी रद्द केल्या असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे. यावरून फडणवीस सरकार कुणबी नोंदी रद्द करण्याचा डाव खेळत असल्याचे सिध्द होते, असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कवठेमहांकाळ येथे केला.
तसेच मराठ्यांच्या कुणबी नोंदी रद्द करून मराठा समाजामध्ये नोंदी रद्द होऊ लागल्या आहेत, असा गैरसमज पसरविण्याचा उद्योग सरकारने सुरू केला आहे. त्यामुळे या अफवांवर मराठा समाजाने विश्वास ठेवू नये, असेही ते म्हणाले.