Jayant Patil| मतांसाठी पसरवला धार्मिक द्वेष

आमदार जयंत पाटील; शिराळा येथे सामाजिक सलोखा परिषद
Jayant Patil
Jayant Patil
Published on
Updated on

शिराळा : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावांचा वापर राजकारणासाठी होत आहे, हे आपले दुर्दैव म्हणायचे. मतांसाठी महापुरुषांच्या नावाने कार्यक्रम घेऊन एकमेकांविरुद्ध धार्मिक द्वेष शिकविला, पसरवला जात असल्याचे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले.

येथे आयोजित शिराळा-वाळवा तालुक्याच्या सामाजिक सलोखा निर्धार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक, डॉ. भारत पाटणकर, सुहास फडतरे महाराज, कॉ. धनाजी गुरव, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, पत्रकार विजय चोरमारे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, माणूस जन्माला येताना तो कोणत्या धर्मात, कोणत्या जातीत जन्माला येईल हे त्याच्या हातात नसते. ते नैसर्गिक आहे. त्यामुळे धर्मा-धर्मात भेद करणे योग्य नाही. सलोखा परिषद ही समाजातील समतोल राखण्यासाठी आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्या घराण्याचा इतिहास विसरून बोलले जात आहे. मतांच्या राजकारणासाठी एकाच बाजूने टोकाची भूमिका घेतली जात आहे. आम्ही समाजात कोणती बीजे रोवायची व कशाचा आग्रह धरला पाहिजे, यासाठी कमी पडल्याने एखाद्या गोष्टीला भुलून थवेच्या थवे आता वेगळ्या विचाराला बळी पडले. द्वेषाची बीजे रोवली गेली, हे आपले अपयश आहे.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, घटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य दिले आहे. सामाजिक आणि आर्थिक समता आपणाला अद्याप मिळालेली नाही. आपापसातील लढाई संपली पाहिजे, हे आजच्या तरुणांना सांगण्याची गरज आहे. त्यासाठी या सामाजिक सलोखा परिषदेच्या माध्यमातून घरोघरी जागृती करूया.

स्मिता पानसरे म्हणाल्या, सध्या लोकांच्यात भीती, असुरक्षितता, द्वेष निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. आपला इतिहास, क्रांती आपणच सांगायला हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करून सलोखा आणण्यासाठी चुकीच्या विरोधात उभे राहा. सत्तेच्या आधाराने संविधान बदलण्याचा प्रयत्न करणारे आता त्यास वळसा घालून मनुस्मृती आणण्याचे प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. सुहास फडतरे महाराज म्हणाले, मनात समता असेल तर सलोखा निर्माण होतो. बहुजनांच्या मुलांना हिंदुत्ववादी अफूची गोळी देऊन त्यांची डोकी भडकवली जात आहेत.

रणधीर नाईक म्हणाले, चांगल्या विचाराचे बीज पुन्हा पेरण्यासाठी नव्याने प्रबोधनाची चळवळ तरुणांच्या समोर मांडणे गरजेचे आहे. जुन्या काळात शिक्षणापेक्षा लोकांचे विचार थोर असल्याने प्रतिसरकारची स्थापना झाली. या प्रतिसरकारच्या तालुक्यात सलोखा परिषद घ्यावी लागते, हे दुर्दैव आहे. यावेळी प्रा. सम्राट शिंदे, बाळासाहेब नायकवडी, ॲड. रवी पाटील, कॉम्रेड धनाजी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक बी. जी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक कोठावळे यांनी केले. आभार सुनील तांदळे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news