(संकलन : अंजर अथणीकर)
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारीरोजी मतदान होत आहे. महापालिकेची एकूण लोकसंख्या 5 लाख 2 हजार 793 असून, यामध्ये 4 लाख 54 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजवणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत मतदारांना फक्त एक मत न देता, चार स्वतंत्र मते देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी मतदान यंत्रामध्ये चार वेगवेगळ्या रंगांची (दोन ठिकाणी तीन) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवण्यात येत आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना पुढील प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे.
अशी आहे मतदानाची प्रक्रिया...
महानगरपालिका निवडणुकीत प्रभागनिहाय चार सदस्यीय प्रणाली लागू करण्यात आली आहे.
प्रत्येक मतदाराला चार वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार आहे.
केवळ प्रभाग क्रमांक 13 आणि 20 मध्ये तीन सदस्यीय रचना असल्याने तेथील मतदारांना तीन मते द्यावी लागणार आहे.
मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमवर प्रत्येक मतासाठी स्वतंत्र बटण असेल.
उमेदवारांना अ, ब, क, ड अशा क्रमाने दर्शवण्यात आले आहे.
प्रत्येक मत नोंदविल्यानंतर यंत्रामधून बीप असा आवाज येईल. तो आवाज ऐकल्यानंतरच पुढील मत नोंदवता येईल.
मतपत्रिकांसाठी वेगवेगळे रंग निश्चित करण्यात आले आहेत. ते असे : ‘अ’ साठी पांढरा, ‘ब’ साठी फिकट गुलाबी, ‘क’ साठी फिकट पिवळा, ‘ड’ साठी फिकट हिरवा
एका जागेसाठी एकाच उमेदवाराला एकच मत देता येईल.
अ, ब, क, ड या चारही गटांमध्ये चार वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान करणे आवश्यक आहे.
सर्व मते नोंदवल्यानंतरच मतदान पूर्ण होईल.
प्रत्येक गटासाठी ‘नोटा’चा स्वतंत्र पर्याय उपलब्ध असणार आहे. कोणताही उमेदवार पसंत नसेल, तरी त्या गटासाठी नोटाचा पर्याय निवडता येणार आहे.
आपली महापालिका एक नजर
एकूण लोकसंख्या : 5 लाख 2 हजार 794. एकूण मतदार : 4 लाख 54 हजार 430, एकूण मतदान कर्मचारी नियुक्त : 2 हजार 635 (10 टक्के अतिरिक्त वेगळे), मतदान केंद्रे : 527, त्रासदायक मतदान केंद्रे : 91, मतदानाची वेळ : सकाळी 7.30 त सायं. 5.30
एकूण निवडून देण्याचे उमेदवार : 78