Mahavitaran Tariff Hike 2025
विजय लाळे
विटा : राज्यातील महावितरण कंपनीकडून वीजदर कमी करण्याच्या नावाखाली केलेल्या करामतीमुळे प्रत्यक्षात ग्राहकांना दरवाढीचा मोठा धक्का बसला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने मार्च २०२५ मध्ये दिलेल्या आदेशानुसार, नियमबाह्य वीज गळती मान्य न करताच ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला होता. मात्र, महावितरणने या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली. त्यावर आयोगाने स्वतःच्याच आदेशाला स्थगिती देत २५ जून २०२५ रोजी नवीन दरवाढीचा निकाल दिला. परिणामी, १ जुलैपासून राज्यभरात वीजदर वाढले.
दरम्यान, ऊर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैपासून वीजदर कमी होणार असल्याची घोषणा केली. त्याच पार्श्वभूमीवर महावितरणने दरवाढ लपवण्यासाठी जुलै महिन्याच्या वीजबिलात ग्राहकांच्या वर्गवारीनुसार प्रति युनिट २४ ते ६५ पैसे "वजा इंधन अधिभार" दाखवला. परंतु ऑगस्टमध्ये उच्चदाब ग्राहकांकडून उलट प्रति युनिट ३५ पैसे अधिक आकारले गेले. त्यामुळे लाखो युनिट वापरणाऱ्या औद्योगिक ग्राहकांना एका महिन्यात प्रति युनिट तब्बल १ रुपयाचा जादा खर्च सहन करावा लागला.
याचप्रमाणे, २७ अश्वशक्तीपर्यंतच्या छोट्या यंत्रमाग ग्राहकांकडून जुलैमध्ये प्रति युनिट २५ पैसे वजा दाखवण्यात आले होते. मात्र, ऑगस्टमध्ये हेच दर उलट वाढवून प्रति युनिट १२ पैसे अधिक आकारले गेले. अशा प्रकारे ग्राहकांवर प्रतियुनिट ३७ पैशांची अतिरिक्त दरवाढ लादली गेली. या प्रकाराला ग्राहक फसवणूक म्हणून पाहिले जात असून औद्योगिक आणि व्यावसायिक वीजग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आधीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकन टॅरिफ वाढीमुळे वस्त्रोद्योगासह सर्वच उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच राज्य शासनाने घातलेल्या वीजदरवाढीच्या झटक्यामुळे उत्पादन खर्च झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे निर्यातक्षम वस्तू विक्रीबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.- किरण तारळेकर (राज्य यंत्रमाग धारक संघटना)