सांगली : पुढारी वृत्तसेवा
जत तालुक्यातील काही गावांमध्ये 4 ऑक्टोबर रोजी भगर पिठाचे सेवन केल्याने नागरिकांना मळमळ, उलटीचा त्रास झाला. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने मे. जगदंबा ट्रेडर्स, जत या पेढीची तपासणी करून भगर व पिठाचे पाच अन्न नमुने तपासणीकरिता घेऊन उर्वरित 3 लाख 34 हजार 918 रुपये किमतीचा साठा जप्त केला होता. या पेढीचा परवाना निलंबित करण्यात आला असून, पेढी सीलबंद करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त नि. सु. मसारे यांनी दिली.
अन्न नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अ. अ. पवार, च. रा. स्वामी व ध. वि. आघाव यांनी केली. कोणतेही अन्नपदार्थ खरेदी करताना लेबल तपासूनच तो खरेदी करावा, असे आवाहन करण्यात आले.