Fraud Case (File Photo)
सांगली

Land Deal Fraud Sangli | जागेच्या व्यवहारात सांगलीतील माजी नगरसेवकाची कोटीची फसवणूक

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ईश्वरपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्याविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली शहरातील एका जागेचा व्यवहार पूर्ण करण्याची लेखी खात्री देऊन खरेदीपोटी एक कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ईश्वरपूर शहराध्यक्ष व माजी नगरसेवक शहाजी राजाराम पाटील यांच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सांगलीतील माजी नगरसेवक शीतल जिनगोंडा पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

महापालिका हद्दीतील सिटी सर्व्हे नं. 393/1 मधील 1.65 आर. क्षेत्रफळ असलेल्या जागेपैकी 1/3 हक्क हिश्श्याची जागा माजी नगरसेवक शीतल पाटील यांनी स्वस्ती वास्तू डेव्हलपर्स एलएलपीतर्फे भागीदारीत घेण्याचे ठरवले होते. ही जागा ईश्वरपूरचे माजी नगरसेवक शहाजी पाटील यांनी त्यांना दाखवली होती. या जागेचे आपणच मालक आहोत, तुम्हाला जमिनीचा व्यवहार पूर्ण करून देतो, अशी लेखी खात्री देत मूळ मालकाशी केलेले करारपत्र दाखवून त्यांनी शीतल पाटील यांचा विश्वास संपादन केला.

बाजारभावाप्रमाणे जागेची किंमत 5 कोटी 73 लाख रुपये ठरविण्यात आली होती. शीतल पाटील यांनी शहाजी पाटील यांना दि. 16 सप्टेंबर 2022, 17 सप्टेंबर 2022 व दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी प्रत्येकी 25 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले, तसेच रोख 25 लाख रुपये दिले. एक कोटी दिल्यानंतर खूषखरेदीपत्र नोंद करण्याचे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे शहाजी पाटील यांनी स्टॅम्प पेपरवर सविस्तर खरेदीपूर्व करारपत्र माधवनगर येथे केले. हा करार नोटरी करण्यात आला. त्यावेळी साक्षीदार म्हणून अनंत मोहन जाधव (रा. पंचशीलनगर) व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी डोंगरे यांनी स्वाक्षरी केली.

करारपत्र झाल्यानंतर शीतल पाटील आणि भागीदारांनी कराराप्रमाणे व्यवहार पूर्ण करण्यासाठी शहाजी पाटील यांची भेट घेतली. परंतु त्यांनी मूळ मालकाकडून खरेदीपत्र करून देण्यास टाळाटाळ केली. तसेच इसारतपोटी घेतलेले एक कोटी रुपये परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शीतल पाटील यांनी तक्रार दिली. या प्रकरणाची सुरुवातीला चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता शहाजी पाटील यांच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल पाटील हे आमचे सहकारी आहेत. व्यावसायिक दृष्टिकोनातून काही गोष्टी ठरल्या होत्या. त्याप्रमाणे त्या घडण्यासाठी विलंब होत असल्याने त्यांनी ही तक्रार केली असावी. आम्ही त्यांच्याशी चर्चा करीत असून गैरसमजातून झालेल्या तक्रारीबाबत आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत.
शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, ईश्वरपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT