प्रिंटरचे वितरण करताना खा. विशाल पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, आ. सुमन पाटील, जयश्री पाटील, आ. अरुण लाड, पृथ्वीराज पाटील व इतर मान्यवर.  Pudhari photo
सांगली

‘लाडक्या’ योजना फक्त निवडणुकीपुरत्या

आ. डॉ. विश्वजित कदम यांची टीका : सरकारला आम्ही जागे केल्याचे हे परिणाम

करण शिंदे

लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी आजी, लाडके आजोबा... अजून खूप योजना येणार आहेत. पण या सर्व योजना निवडणुकीपुरत्याच आहेत, अशी टीका करून, सरकार झोपलेले होते, त्यांना आम्ही जागे केल्याचे हे परिणाम असल्याचे मत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. असल्या योजनांच्या फायद्यातून दिशाभूल होऊ नये, फसवणूक होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक निधीतून सांगली जिल्ह्यातील 640 शाळांना आज प्रिंटरचे वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. खासदार विशाल पाटील, आ. विक्रम सावंत, आ. सुमन पाटील, आ. अरुण लाड, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिगंबर जाधव आदी मान्यवरांच्याहस्ते हे वितरण करण्यात आलेे. यावेळी सर्वच नेत्यांनी शासनाच्या या योजनांवर सडकून टीका केली.

शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यातून मार्ग काढायला धमक लागते. आम्ही त्यासाठी आंदोलने केली, पाठपुरावे केले, यापुढेही आम्ही निर्णय घेऊ, असे मत आ. डॉ. कदम यांनी व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा आणि शिक्षणाचा वारसा आहे. इथे शिक्षण संस्थांचे जाळे आहे. पण गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात खूप बदल झाले आणि दुर्दैवाने जे घडायला नको, ते घडू लागले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खासदार विशाल पाटील म्हणाले, शिक्षण पध्दत बदलत चालली असताना, या व्यवस्थेला उद्या काय पाहिजे, याचा विचार करून योजना राबविण्याची गरज आहे. त्यासाठी निधीही वाढवावा लागेल. आ. सावंत यांनी, शिक्षण खात्यात रोज नवनवीनच अध्यादेश निघतात आणि ते सारखे बदलत असतात, अशी खंत व्यक्त केली. या माध्यमाच्या शाळांमध्ये त्या भाषेतील शिक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यात बदल करण्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा केला. पण अद्यापही निर्णय झाला नाही. माध्यमिक शाळांसमोर अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी संयुक्त बैठकीची गरज असल्याचे सांगून, दुर्गम भागातील शाळांना प्रोजेक्टर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

आ. लाड यांनी शासनाच्या शिक्षणविषयक धोरणांवर टीका केली. प्राथमिक शाळेत खडू, फळा मिळत नाही आणि वैद्यकीय शिक्षणात दर्जा राहिलेला नाही. शिक्षकांची आंदोलनेही वाढली आहेत. अशावेळी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ असल्या योजना राबविण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी करणार्‍या योजना राबविण्याची गरज आहे. पण सरकारचे काहीतरी वेगळेच सुरू असल्याची टीका त्यांनी केली. आ. आसगावकर यांनी कामांचा आढावा घेतला. स्वागत अमृत पांढरे यांनी केले. प्रास्ताविक अरविंद जैनापुरे यांनी केले. एन. डी. बिरनाळे, प्रा. नागरगोजे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महिला आघाडीच्या नेत्या मनीषा रोटे, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, जे. के. बापू जाधव यांच्यासह विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

करंजीया आणि पतंगराव

खासदार विशाल पाटील यांनी आपले पारशी शिक्षक करंजीया यांची आठवण यावेळी सांगितली. पतंगराव कदम यांनी राज्यात सगळ्यात जास्त अनुदानित शाळा मंजूर केल्याची आठवण आमदार डॉ. कदम यांनी सांगितली. किमान विनाअनुदानित हा शब्दच त्यांनी कायमचा काढून टाकला. मार्ग काढायचे असतील, तर त्यांच्यासारखी धमक दाखवत काम करायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

सत्तेत आल्यावर नक्की लक्ष देऊ

आ. आसगावकर यांनी शिक्षकांसमोर अनेक प्रश्न असल्याचे सांगून, त्याबाबत काही तरी करा, शिक्षकांकडे लक्ष असू द्या, असे आवाहन केले. त्यावर, आम्ही सत्तेत आल्यावर नक्की लक्ष देऊ, असे आश्वासन आ. डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT