कुरळप : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे जुन्या भांडणातून चाकूने भोसकून एकाचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. सिद्धेश्वर सीताराम काळे (रा. वाळूज, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे, तर वारलेस हिवराज पवार (रा. वाळूज) असे संशयिताचे नाव आहे. कुरळप पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत आदर्श अमर काळे (वय 18, रा. कुंडलवाडी, ता. वाळवा) याने फिर्याद दिली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील सिध्देश्वर काळे हा गेल्या वीस वर्षांपासून कुंडलवाडी येथे राहत होता. सिद्धेश्वर काळे व संशयित वारलेस हे नातेवाईक आहेत. दोघेही शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट रोजी कुंडलवाडी येथे अमर काळे याच्या घरी आले होते.
रात्री साडेदहाच्या सुमारास वारलेस पवार याने जुन्या वादाच्या रागातून सिध्देश्वर काळे याच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यावर वारलेस याने सिद्धेश्वर याला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने छातीच्या उजव्या बाजूला वार केला. यामध्ये सिध्देश्वर गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला. या खुनामागे जुन्या भांडणाचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक निरीक्षक विक्रम पाटील करत आहेत.