Sangli Flood Situation
सांगली : हरिपूर येथे कृष्णा-वारणा नद्यांच्या संगमावर पाणीपातळी वाढली आहे.  Pudhari Photo
सांगली

Sangli Flood News : कृष्णा-वारणाकाठ धास्तावला

पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यासह कृष्णा-वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. वाढता पाऊस व धरणांतून सुरू असलेला विसर्ग यामुळे महापूर कृष्णा-वारणाकाठच्या उंबरठ्यावर आला आहे. जिल्ह्यात महापालिका क्षेत्रासह 104 गावांना महापुराचा धोका आहे. त्यामुळे नदीकाठचे नागरिक धास्तावले आहेत.

वारणा धरणातून 10 हजार, कोयना धरणातून 21 हजार 50 व कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणी उद्या (शुक्रवारी) दुपारनंतर सांगलीत पोहोचणार आहे. तसेच शुक्रवारपासून कोयना धरणातून 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 37 ते 40 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत ती 34 फुटापर्यंत पोहोचली होती. दरम्यान, अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

सांगलीसह जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्याशिवाय महाबळेश्वर, नवजा, चांदोली आदी भागातही पावसाचा जोर आहे. कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणात बुधवारी सायंकाळी 5 वाजता 78.29 टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण 75 टक्के भरले आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातील 20 मेगावॅट क्षमतेचे एक जन्नित्र सुरू केले आहे. या जन्नित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1,050 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्याशिवाय सायंकाळी 5 वाजता 10 हजार, तर 7 वाजता आणखी 10 हजार असा 21 हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे पाणी उद्या दुपारनंतर सांगलीत पोहोचणार आहे. तसेच कोयनेतून विसर्गात वाढ होणार असून, 30 हजार क्युसेक विसर्ग होणार आहे. त्याशिवाय वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे सांगलीत पाणी पातळी वाढेल, असा अंदाज पाटबंधारे अधिकार्‍यांनी वर्तविला आहे.

मिरज, वाळवा, पलूस, शिराळा तालुक्यांत आज शाळांना सुटी

जिल्ह्यात आणि कोयना धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे व संभाव्य पुराच्या शक्यतेने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालयांना शुक्रवार, दि. 26 जुलैरोजी सुटी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार सायंकाळी याबाबत आदेश काढला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज महानगरपालिका क्षेत्रासह, वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक शाळा, तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महाविद्यालये (शासकीय, निमशासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व संस्थांना 26 जुलैरोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत, विद्यालयात, महाविद्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

शिराळा तालुक्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे तालुक्यातील नऊ पूल पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक बंद झाल्याने शिराळा, शाहुवाडी तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. वाळवा तालुक्यातही पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. वारणा नदीचे पाणी गावात शिरल्याने कणेगाव- भरतवाडीचा संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थिती लक्षात घेता, येथील लोकांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे.

सांगलीत जनजीवन विस्कळीत

सांगली शहरात बुधवारी दिवसभर पावसाचा जोर होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस व पाणी पातळीतील वाढ आणि आता धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ लक्षात घेता, नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणांतून विसर्ग वाढविल्यास व पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास शनिवार, रविवारपर्यंत महापूर येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सांगलीत पाणी पातळी वाढल्याने सांगली, मिरजेतील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे कोयना व वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर 31 ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. त्याशिवाय सांगली, सातारा जिल्ह्यांतही पावसाचा जोर असणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस पावसाचा जोर काहीसा कमी असणार आहे.
- राहुल पाटील, मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान
SCROLL FOR NEXT