जत : कोंत्येवबोबलाद (ता. जत) येथील डाक कार्यालयात 40 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सांगली येथील पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अवर अधीक्षकांनी कार्यालयास भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. ठेवीदार व खातेदारांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी थेट पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही अधिकार्यांसमवेत कोंत्येवबोबलाद येथे भेट घेऊन या घटनेची सखोल चौकशी करावी. फसवणूक झालेल्या ठेवीदार, खातेदारांना न्याय मिळावा. त्यांची रक्कम परत द्यावी. तसेच दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना केल्या.
या आर्थिक व बोगस कारभाराची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. जत उपविभाग डाक उपनिरीक्षक किसन गोंड, डाक अवेक्षक अशोक तेली, डाक अवेक्षक मुनीर मकानदार या तिघांचा या समितीत समावेश आहे. ही समिती सोमवारपर्यंत अहवाल सादर करणार आहेत. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्या ठेवीदार व खातेदारांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले केले.
पासबुकवर बोगस नोंदी, शिक्क्यांचा वापर
सोमवार, दि. 23 ऑक्टोबररोजी सांगली कार्यालयास निनावी दूरध्वनीद्वारे माहिती.
संशयित उप डाकपालाच्या घरात प्रिंटर व शिक्के असल्याची चर्चा.
बुधवारी ठेवीदार आक्रमक होताच उप डाकपाल औरसंगे पसार.
अवर अधीक्षक यांच्याकडून तिघांची चौकशी समिती नियुक्त.
आमदार पडळकर यांची अधिकार्यांसमवेत शनिवारी भेट
नेमकी रक्कम अद्याप अस्पष्ट, मात्र 1 कोटीचा अपहार झाल्याची चर्चा.
जत : कोंत्येवबोबलाद येथे ठेवीदारांशी आमदार गोपीचंद पडळकर यांनी संवाद साधला. यावेळी बसवराज वालीकर, सरदार पाटील उपस्थित होते.