महापालिकेने मारले ; पावसाने तारले  Pudhari File pHoto
सांगली

महापालिकेने मारले ; पावसाने तारले

सांगलीत पावसाच्या पाण्याची केली साठवणूक, मंगळवारी पुरवठा होणार पूर्ववत

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगलीत जलवाहिनीला झालेली गळती काढण्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अनेक भागात पाणीपुरवठा बंद होता. मात्र रविवारी शहरात झालेल्या पावसाचे पाणी अनेकांनी साठवून वापरले. त्यामुळे महापालिकेनेे मारले, पण पावसाने तारले, अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत होती.

माधवनगर रोडवरील माळबंगला येथे महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. तिथून सांगलीत हिराबागकडे आठशे एमएम व्यासाची मुख्य जलवाहिनी येते. या जलवाहिनीच्या पाण्याद्वारे हिराबाग येथील जुनी व नवीन टाकी (जलकुंभ), सांगलीवाडी येथील 2 टाक्या, तसेच आकाशवाणी, विश्रामबाग, जलभवन व हनुमाननगर येथील प्रत्येकी एक टाकी, अशा एकूण 8 टाक्या भरल्या जातात. शुक्रवारी रात्री उशिरा हिराबाग येथे जलवाहिनीच्या जॉईंटला मोठ्या प्रमाणात लिकेज झाले. या जलवाहिनीचा पाणीपुरवठा थांबवण्यात आला. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी अनेक भागात पाणीपुरवठा बंद होता. परिणामी नागरिकांची गैरसोय झाली. बहुसंख्य जणांनी पाणी जपूनच वापरले.

शहरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बहुसंख्य जणांनी पावसाचे पाणी खर्चासाठी साठवले. अनेक घरांच्या बाहेर, टेरेसवर पाणी साठवले. त्यामुळे ज्या भागात पाणी आले नव्हते त्या भागातील लोकांना पावसाने आधार दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती. दरम्यान, पावसामुळे गळती काढण्यात अडचणी आल्या. काही भाग दुरुस्त झाला आहे. मात्र अजूनही काही भाग दुरुस्त होणे बाकी आहे. 8 टाक्यांपैकी सहा टाक्या भरून घेतल्या आहेत. रविवारी काही भागात कमी प्रमाणात पाणीपुरवठा सुरू होता. मात्र मंगळवारपासून पाण्याचा पुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT