आटपाडी : पुढारी वृत्तसेवा
खरसुंडी श्री सिध्दनाथ देवस्थानला ब वर्गाचा दर्जा मिळाला आहे.आत्तापर्यंत विकासापासून वंचित कुलदैवत सिध्दनाथाच्या नाथनगरीच्या विकासाला खर्या अर्थाने चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.खरसुंडी श्री सिध्दनाथ देवस्थानला ब वर्ग देवस्थान दर्जा मिळवून दिल्याबद्दल ग्रामपंचायत, देवस्थान समिति आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, हर्षवर्धन देशमुख, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, सरपंच धोंडीराम इंगवले, उपसरपंच राजाक्का कटरे, राहुल गुरव, विक्रम भिसे उपस्थित होते.
खाडे म्हणाले, देवस्थानला न्याय देता आल्याचा आनंद मोठा आहे. सेवा सुविधासाठी पाच कोटींचा निधी मिळेल. अ वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करू.राजेंद्र अण्णा देशमुख म्हणाले, या देवस्थानचा विकासासाठी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत एकत्र प्रयत्न करून काम करावे. सिद्धनाथांच्या लाखो भाविकांना सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा.
ब्रह्मानंद पडळकर म्हणाले गटातटाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन देवस्थानचा विकासासाठी प्रयत्न करावेत. आ. गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून या देवस्थानला निधीची कमतरता भासणार नाही. यामुळे गावात सुविधा मिळणार आहेत.स्वागत प्रास्ताविक राहुल गुरव यांनी केले. यावेळी बीडीओ सचिन भोसले, ग्रामविकास अधिकारी कामेश्वर ऐवळे, ग्रामसेवक पवन राऊत उपस्थित होते. संजय बाबर यांनी आभार मानले.