खानापुरातील दोन माजी आमदारांनी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली  
सांगली

खानापुरात महायुतीला पडणार खिंडार? दोन माजी आमदारांनी शरद पवारांकडे मागितली उमेदवारी

पुढारी वृत्तसेवा

विटा : राष्ट्रवादी अजित पवार गटातील माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह भाजपमधील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे मंगळवारी (दि.८) उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघात महायुतीला खिंडार पडण्याची शक्यता आहे.

पुण्यात मंगळवारी (दि.८) राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यात खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण सहा जणांनी उमेदवारीची मागणी केली. विशेष म्हणजे यात राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील तर भाजपमधील माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीला खिंडार पडण्याची शक्यता आहे.

यावेळी खानापूर तालुक्यातून माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह आटपाडीचे रावसाहेब पाटील, सादीक खाटीक आणि आनंदराव पाटील यांनीही मुलाखती दिल्या. या मुलाखती पक्षाचे अध्यक्ष खुद्द खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतल्या. तर सांगली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक आणि सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आपण चार निवडणूका लढलो असून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलो. विधानसभेच्या कामकाजाचा आपल्याला चांगला अनुभव आहे. आपल्या कालावधीत मतदारसंघात मोठी कामे करण्यात यशस्वी झालो असल्याचे सांगत विधानसभेसाठी पक्षाने संधी दिल्यास विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. तर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आपण १९९५ ला आमदार म्हणून काम केले आहे. आपल्याला विधानसभेतील कामकाजाचा अनुभव आहे. शिवाय आमदार असताना केवळ आपण आणि पक्षाने आदेश दिला म्हणून १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम केले आणि निवडून आणले. तसेच केवळ पक्षाने सांगितले म्हणून पाच वेळा थांबलो. यानंतर सलग खानापूरला संधी मिळाली आहे. आता मात्र ३० वर्षांनी आटपाडी तालुक्याला संधी दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली.

तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनीही उमेदवारी मागताना आपण पाच वर्षे सातत्याने लोकांच्या संपर्कात आहोत. मतदारसंघातील सर्वात मोठ्या विटा शहराचे नगराध्यक्ष म्हणून आपण काम पाहिले आहे. तरूणांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे आपल्याला संधी दिल्यास आपण चांगले काम करू शकू, असा विश्वास वैभव पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आटपाडी तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील आणि सादीक पाटील यांनीही उमेदवारीची मागणी केली. या तिघांनीही आटपाडी तालुक्या लाच उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT