बसेस स्वच्छ ठेवा, वेळेत सोडा, विद्यार्थ्यांची सोय करा आदी गार्हाणी ‘प्रवासी राजा’ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रवाशांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे मांडली. प्रवासी राजा दिन उपक्रमाला सांगली जिल्ह्यात सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. यानिमित्ताने 15 जुलैरोजी सांगलीच्या मुख्य आगारात प्रवासी गार्हाणी मांडण्यासाठी उपस्थित होते. यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, शीतल माने, पालक अधिकारी विजय मोरे उपस्थित होते.
यावेळी प्रवाशांनी आपल्या अनेक अडचणी मांडल्या. बसेस अत्यंत अस्वच्छ असतात. खिडक्या मोडलेल्या, काही बसेस गळक्या आहेत. त्यांच्यात सुधारणा करण्यात यावी. अवेळी बसेस सोडण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. विशेष करून लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेत सोडण्यात याव्यात, विद्यार्थ्यांसाठी बसेस अपुर्या पडत असून, शाळा, महाविद्यालयांसाठी सोडण्यात येणार्या बसेस या पुरेशा आणि वेळेत सोडण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी सुनील भोकरे यांनी, या तक्रारींची दखल घेत असून, याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिले. त्यांनी आगार व्यवस्थापकांना बसेस स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या.
मिरज : 19 जुलै, इस्लामपूर 23 जुलै, तासगाव 26 जुलै, विटा 29 जुलै, जत 2 ऑगस्ट, आटपाडी 5 ऑगस्ट, कवठेमहांकाळ 9 ऑगस्ट, शिराळा 12 ऑगस्ट व पलूस 16 ऑगस्ट. हे सर्व उपक्रम सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राबवण्यात येणार असून, एसटीचे वरिष्ठ अधिकारी गार्हाणी ऐकणार आहेत.