सांगली

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईंचे वक्तव्य दिशाभूल करणारे : माजी आमदार विलासराव जगताप

अमृता चौगुले

जत; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकात घेऊ, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही पत्रकार बैठक घेत कर्नाटकला खडे बोल सुनावले. एकीकडे बेळगाव, निपाणी, कारवार भागातील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे, त्यांचे समाधान कर्नाटक सरकार करू शकले नाही. मग आता जतची चाळीस गावे घेवून काय साध्य करणार आहात? असा खडा सवाल करत कर्नाटकने जतला कधीही पाणी दिले नाही. पावसाचे पडलेले पाणी नैसर्गिकरित्या जत तालुक्यात आले म्हणजे जतला आम्हीच पोसतो असे होत नाही.

जगताप म्हणाले, जत तालुक्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीने कर्नाटकात जाण्याचा ठराव केला नाही. त्याची नोंद कुठेही नाही. असे असताना ४० गावांवर दावा करणे म्हणजे केवळ स्टंट आणि दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. जत तालुक्यातील विकासाच्या आणि पाण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने अन्याय केला ही बाब खरी आहे. म्हणून काय आम्ही आमचे राज्य सोडणार नाही. तालुक्याचा बहुतांशी भाग कर्नाटक सीमेवर आहे. इकडच्या लोकांचे तिकडच्या लोकांशी सलोख्याचे संबध आहेत.

कर्नाटकने अलिकडे पाणी, वीज, शेती अवजारे, बियाणे, रस्ते याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे. आमच्या भागाला ती रोज दिसते. यातून आमच्या लोकांच्या मनात तशा विकासाच्या भावना तयार होतात, तो नैसर्गिक स्वभाव आहे. म्हणून जत तालुका कर्नाटकात विलीन होईल, असे होत नाही. मागे सीमा प्रश्नावर महाजन अहवाल दिला होता, त्यात जतमधील ४४ गावे कर्नाटकला जोडता येतील असे म्हटले होते. परंतु त्यावेळीही येथील कुठल्याही गावाने तिकडे जाण्यासाठी ठराव दिला नाही. तसेच मागच्या कालावधीतही तालुकयात तसा कुठलाच ठराव झालेला नाही. याउलट आम्हाला महाराष्ट्रच हवा आहे, अशी येथील लोकांची मागणी आहे. आम्ही आमच्याच राज्याकडे पाण्यासाठी विकासासाठी भांडत आहोत. स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानंतरही तालुक्याला अजून म्हैसाळचे पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. पूर्व भागातील वंचित ६७ गावांसाठी प्रस्तावित असलेली विस्तारीत योजनेचा प्रश्न सुटत नाही.

पूर्व भागातील गावांसाठी आम्ही पुढाकार घेवून विस्तारीत योजना तयार केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तत्वता मंजुरी दिली. पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केवळ सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले, यापेक्षा जास्ती काहीच झाले नाही. खरतंर जतवर हा अन्याय आहे. आजवरच्या इतिहासात स्वर्गीय शंकरराव चव्हाण आणि राजारामबापू यांनी जत पूर्व भागाला वीज देण्याची मागणी पूर्ण केली. हे एकमेव चांगले आणि तातडीने झालेले काम वगळता, जतच्या बाबतीत राज्यात अन्यायच झाला आहे.

एकीकडे सधन तालुके अतिसधन होत आहेत. तर जतसारखे दुष्काळी तालुके अति दुष्काळी होत आहेत, ही मोठी खंत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने या स्टंट बाजीवर विचार न करता जतला वरदान ठरणारी विस्तारीत योजना मंजूर करून जतच्या लोकभावनेची कदर करावी. आम्ही महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, जाण्याचा प्रश्न नाही. बोम्मई यांनी केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. त्यात तथ्य नाही, असेही माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत उपस्थित होते.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT