Jayshree Patil Sangli Politics
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासनस्तरावर हालचाली गतिमान झाल्या, तसे राजकीय आघाडीवरही वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. भाजपने महापालिका निवडणुकीच्या तयारीचा पहिला बार जोरात उडवून दिला आहे. जयश्री पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही प्रयत्न सुरू होते. मात्र 'महायुती'त भाजप हाच मोठा भाऊ असल्याने मदनभाऊ गटाने भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. वसंतदादा बँक प्रकरणही या सर्व घडामोडीत केंद्रस्थानी राहिले.
लोकसभा निवडणुकीत सांगलीत भाजपचा मोठा पराभव झाला. विशाल पाटील यांचा विजय हा जिल्हाभरच काँग्रेसला एक नवे बळ देऊन गेला. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती होईल, अशी अटकळ काँग्रेसमध्ये होती. सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी जयश्री पाटील खूप आग्रही होत्या. पण उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली. मात्र त्यांचा पराभव झाला. काँग्रेसचे पराभूत उमेदवार व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या तक्रारींमुळे जयश्री पाटील यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
काँग्रेसने सहा वर्षांसाठी जयश्री पाटील यांना निलंबित केल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर राजकीय पोरकेपण आले. सांगलीत मदनभाऊ गटाला राजकीय ताकद हवी होती. वसंतदादा बँक प्रकरणाची टांगती तलवारही डोक्यावर होती. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी अथवा भाजप हे दोन पर्याय मदनभाऊ गटासमोर होते. दि. २ डिसेंबर २०२४... मदन पाटील यांची जयंती. मदन पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात ठरेल, अशी अटकळ कार्यकर्त्यांमध्ये होती. 'पराभवाने खचून जाऊ नका, घाईगडबड नको, योग्यवेळी निर्णय घेऊ', असा सबुरीचा सल्ला जयश्री पाटील यांनी दिला होता. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांच्या राजकीय हालचालींना गती आली. त्यांनी आठवड्यापूर्वी मदनभाऊ गटातील प्रमुख नेते, कार्यकर्ते यांची बैठक घेतली. प्रमुख व बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाच्या बाजूने कल दिला. मदनभाऊ गटाच्या या बैठकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयश्री पाटील यांच्याशी संपर्क साधून, पक्षप्रवेशाची ऑफर दिली.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीवेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे राष्ट्रवादीवासी झाले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला. भाजपने दूर लोटल्याने माजी खासदार संजय पाटील यांनीही आता स्वतःला राष्ट्रवादीत रमवून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 'नंबर वन' हे स्थान कायम ठेवण्यासाठी भाजपनेही राजकीय हालचाली सुरू केल्या. सांगलीत जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला.
महापालिका क्षेत्रात मदनभाऊ गटाची ताकद बऱ्यापैकी आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांत या गटाला मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. महापालिकेच्या राजकारणात मदनभाऊ गटाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. अशा परिस्थितीत हा गट आपल्याकडे यावा, यासाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विशेष प्रयत्नशील होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा फोन, त्यानंतर जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी घेतलेली जयश्री पाटील यांची भेट, या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक नेते सक्रिय बनले. मदन पाटील गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर महापालिका निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहणार नाही, राष्ट्रवादीला बरोबरीने संधी द्यावी लागणार, हे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपने विजय बंगल्यावर 'फिल्डिंग' लावली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'गुड बुक'मध्ये असणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी जयश्री पाटील यांच्याशी संपर्क साधला. आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार यांनीही जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाला 'ना-हरकत' दिली. भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयश्री पाटील यांच्याशी थेट संपर्क साधला आणि जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. अजित पवार यांची राष्ट्रवादी गाफील राहिली आणि भाजपने बेरीज घडवून आणली. महापालिका निवडणुकीत भाजपसाठी ही बेरीज महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राष्ट्रवादी की भाजप..?, मदनभाऊ गटापुढे दोन पर्याय होते. यात बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा कल भाजपच्या बाजूने होता. बरेच कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात होते, तर जयश्री पाटील यांनी भाजपऐवजी राष्ट्रवादीत प्रवेश करावा, यासाठी मुस्लिम कार्यकर्ते आग्रही होते. 'वसंतदादा बँक' प्रकरणही या सर्व घडामोडीत केंद्रस्थानी होते. अनियमितताप्रकरणी २३ माजी संचालक व मृत माजी संचालकांच्या वारसांवर १९५ कोटी रुपयांच्या वसुलीची टांगती तलवार आहे. हे सर्व माजी संचालक, वारस हे मदनभाऊ गटाचे नेते, कार्यकर्ते आहेत. खुद्द जयश्री पाटील व त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावे असलेल्या मालमत्तांवरही वसुलीचा बोजा आहे. त्यामुळे या प्रकरणातून सहिसलामत बाहेर पडणे, हे या गटासाठी महत्त्वपूर्ण आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कायद्याच्या चौकटीत बसवून या प्रकरणातून सर्वांना मुक्त करण्याचा शब्द दिला आहे.
महायुतीत भाजप हा मोठा पक्ष आहे. केंद्र, राज्यात सत्तेत आहे. ते काहीही करू शकतात, हा विश्वास असल्याने मदनभाऊ गटाने 'भाजप'ला पसंती दिली.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतही कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असा शब्द चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पक्षप्रवेशापूर्वीच 'डीपीसी'वर जयश्री पाटील यांची वर्णी निश्चित केली आहे. त्यांना भविष्यात संधी, बळ देऊ, असे आश्वासनही दिले आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांत दर दोन-अडीच वर्षांनी राज्यातील राजकीय वातावरण बदलत गेले. त्याचे थेट पडसाद सांगलीतल्या राजकारणावरही होत गेले. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यानंतर सांगलीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बळ आले. भाजप बॅकफूटवर गेली. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही फेब्रुवारी २०२१ मध्ये महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर आणि काँग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर बनले. भाजपमधील काही नगरसेवक राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संपर्कात गेले. भाजपने २०२२ मध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन राज्याची सत्ता काबीज केली. विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीतही भाजपने मोठे यश मिळवले. राज्यात सत्ता आल्याने सांगलीतही भाजपला बळ आले. कुंपणावरील काही नगरसेवक बेमालूमपणे भाजपमध्ये मिसळले. आता महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. मदनभाऊ गट राष्ट्रवादीत जाणार, अशी चर्चा होती. तसे झाल्यास महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचे बळ वाढणार, हे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपने युद्धपातळीवर हालचाली करून जयश्री पाटील यांचा भाजपप्रवेश घडवून आणत, आपण राष्ट्रवादीच्या काही पावले पुढे असल्याचे दाखवून दिले आहे.
सांगलीत काँग्रेसमध्ये प्रकाशबापू गट आणि विष्णुअण्णा गट, अशी भाऊबंदकी होती. त्यांना त्याचा राजकीय फटका अनेकदा बसलेला आहे, लोकसभा निवडणुकीत या घराण्याचे सूर जुळले. मात्र आता जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमधील ही भाऊबंदकी संपली, असे म्हटले जात आहे. काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे पुतणे डॉ. जितेश हे जयश्री पाटील यांचे जावई आहेत. जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश हा डॉ. विश्वजित कदम यांना धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये मन रमेनासे झाल्याने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे भाजपच्या संपर्कात गेल्याची चर्चा होती. जयश्री पाटील यांनीच भाजपत प्रवेश केल्याने त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी पृथ्वीराज पाटील यांची गोची झाली आहे.