Jayant Patil On Gopichand Padalkar:
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. त्यांनी जयंत पाटील यांचे वडील राजारामबापूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची मोठी चर्चा झाली होती.
एवढ्या खालच्या शब्दात टीका होऊनही जयंत पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली होती. मात्र आता त्यांनी यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. त्यांनी वेळ आल्यावर पाहून घेऊ, माझं नाव माहीत नाही असं एक गाव नाही अन् सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव न्हाय अशा शब्दात सूचक आव्हान दिलं.
सांगलीत एका कार्यक्रमात बोलातना जयंत पाटील म्हणाले. 'क्या बडा तो सबसे दम बडा... मागं मी एकदा कुठंतरी सांगितलं होतं. आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव न्हाय... अन् सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव न्हाय...'
तत्पूर्वी, गोपीचंद पडळकर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमातून जयंत पाटील हे राजारामबापूंनी काढलेली ही औलाद वाटत नाही अशी खालच्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर सांगलीतील अनेक भागात पडळकर यांच्याविरूद्ध आंदोलनं झाली होती. बापू बिरू वाटेगावकर यांच्या मुलानं देखील पडळकर यांना सज्जड दम भरला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पडळकरांना समज देण्यात आली असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, ज्यावेळी हे वक्तव्य करण्यात आलं त्यावेळी जयंत पाटील यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. मात्र त्यांनी फक्त हात जाडून कोणतंही भाष्य करणं टाळलं होतं.
आपण करेक्ट कार्यक्रम करतो असं म्हणणारे जयंत पाटील यांनी यावेळी संयमाची प्रचिती दिली होती. आता त्यांनी सगळ्यांना हाणलं नाही तर माझं नाव जयंत पाटील नाही असं म्हणत... ये फैजल सब का बदला लेगा.. स्टाईलनं करारा जवाब मिलेगा असे संकेतच दिल्याची चर्चा भागात आहे.