

Jayant Patil Raj Thackeray Meet Shivtirth
मुंबई : शेकाप पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आज (दि.३) भेट घेतली. या भेटीत नवी मुंबई विमानतळाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
विशेषतः विमानतळावरील कामगार भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे, तसेच नवी मुंबई विमानतळाला दिवंगत शेकाप नेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे, या मागण्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत मनसे, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या तिन्ही पक्षांच्या संयुक्त नेतृत्वाखाली नवी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे स्थानिकांच्या हक्कांसाठी व दिबा पाटील यांच्या नावासाठी लढा उभारला जाणार आहे.
दरम्यान, या नियोजित आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी उद्या (रविवारी) अलिबाग येथे जयंत पाटील यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला शेकाप, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.