Jayant Patil Eknath Shinde Meeting
ईश्वरपूर : ईश्वरपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी भेट घेण्यात आली. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी दिले.
आ. जयंत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात चर्चा करण्यात आली. यापूर्वी याच विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात आली होती.
आनंदराव मलगुंडे हे ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत सुमारे ७ हजार २०० मतांच्या आघाडीने लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे आ. पाटील यांनी नमूद केले.
मात्र, मलगुंडे बंधूंच्या जुन्या अतिक्रमणाशी संबंधित प्रकरणाच्या आधारे त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवकपद रद्द करण्यात आल्याचे सांगत, त्या निर्णयाबाबत शासनाकडे आपली बाजू मांडण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीत केवळ अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात चर्चा झाली असून कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे या भेटीबाबत कोणतेही राजकीय तर्क किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही आ. जयंत पाटील यांनी केले.