गणवेशाच्या मापाचा बसेना मेळ  Pudhari Photo
सांगली

गणवेशाच्या मापाचा बसेना मेळ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुमारे 1 लाख 25 हजार 269 गणवेशांचे मोफत वाटप करण्यात आले. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मापाचा गणवेश मिळाला नाही. त्यामुळे मिळालेला गणवेश घालायचा कसा, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. विद्यार्थ्यांची समजूत काढून शिक्षक वैतागले आहेत. यंत्रणेतील लोक एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे यंदा जुन्याच गणवेशावर शिक्षण घ्यायचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफ त शालेय गणवेश दिला जातो. दरवर्षी शासन पैसे द्यायचे आणि यातून शालेय व्यवस्थापन समिती गणवेश खरेदी करत होती. मात्र यावर्षी धोरणात बदल झाला. गणवेशाचे कापड पुरविण्यासाठी राज्यस्तरावरून पुरवठादार नियुक्त केला आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या मापानुसार कापड दिल्यानंतर महिला बचत गटाच्या माध्यमातून शिलाई केली. गेल्या आठवड्यात गणवेशांचे वाटप पूर्ण झाले. मात्र संबंधितांनी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे माप न घेता कटिंग करून आलेल्या कापडानुसार गणवेश बनविले. परंतु, एकाच वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांची उंची, वजन, आकार एकसारखा असूच शकत नाही हे साधे गणित यंत्रणेला कळले नाही का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

एका वर्गाला ठराविक माप गृहीत धरून गणवेश दिल्यामुळे वर्गातील जी मुले अशक्त आहेत किंवा जे विद्यार्थी सशक्त किंवा उंची व वजनाने मोठे आहेत त्यांना हे गणवेश बसत नाहीत. त्यामुळे कोणाला कोणता गणवेश बसतो हे पाहण्यासाठी शिक्षकांची दमछाक होत आहे. यासंबंधात पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नाहीत. त्यामुळे गणवेशाचे करायचे काय, असा सवाल शिक्षकांसमोर आहे. त्यामुळे यंत्रणेतील अधिकार्‍यांनी एकमेकांकडे बोट न दाखवता हा सावळागोंधळ तातडीने मिटवावा, अशी मागणी शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून होत आहे.

यापूर्वी माप घेऊन होत होती शिलाई...

यापूर्वी शालेय व्यवस्थापन समितीला सर्व अधिकार असल्याने ही समिती स्थानिक पातळीवर गणवेश देणार्‍यांना शाळेत बोलावून घेत असे. त्यांच्याकडील कापड प्रसंत केले की, दुकानदार प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे मोजमाप घेत होते. त्यानंतर गणवेशाची शिलाई करण्यात येत होती. या पद्धतीने वितरण व्यवस्था कायम ठेवली तर निश्चितच गोंधळ झाला नसता, असे काहीजणांचे म्हणणे आहे.

गणवेश शिलाई करण्याची जबाबदारी ‘माविम’कडे होती. विद्यार्थ्यांची मापे वरिष्ठांकडून देण्यात आली आहेत. शिक्षण विभागाचा त्याच्याशी काही संबंध नाही. मापाबद्दल आलेल्या तक्रारी वरिष्ठांना कळविल्या आहेत. प्राप्त सूचनेनुसार कार्यवाही होईल.
- मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि. प.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT