ईश्वरपूर : उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमच नगरपालिकेच्या राजकारणात प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचे चिरंजीव व युवक राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील व युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सचिन कोळी यांची नावे स्वीकृतसाठी निश्चित झाली आहेत. तर उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक खंडेराव जाधव यांना संधी मिळणार आहे.
शुक्रवार दिनांक 16 रोजी ईश्वरपूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदांच्या व उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला दोन तर महायुतीच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक पद येणार आहे. राष्ट्रवादीकडून संग्रामसिंह पाटील व सचिन कोळी यांची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत. बुधवारी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महायुतीकडून मात्र कोणाच्या नावावर एकमत झालेले नाही. अंतिमक्षणी भाजपकडून उमेदवारी नाकारलेले अमित ओसवाले यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. याशिवाय माजी नगरसेवक विक्रम पाटील, विश्वनाथ डांगे, वैभव पवार यांची नावेही स्वीकृतसाठी चर्चेत आहेत.
उपनगराध्यक्ष पदासाठी युवक राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष खंडेराव जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचेही समजते. मात्र विरोधकांच्याकडून विरोधी पक्षनेते पदावरही अद्याप एकमत झालेले नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाने पालिकेत आपला स्वतंत्र गट स्थापन करून गटनेतेपदी सतेज पाटील यांची निवड केली आहे. तर भाजप व शिवसेनेने आपला महायुती म्हणून गट स्थापन करून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण होणार हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.