सांगली

बनावट विवाह नोंदी आधारे वारसा नोंद शासनाची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

जत (सांगली), पुढारी वृत्तसेवा : बनावट कागदपत्र सादर करून ग्रामपंचायत बाज येथे विवाह नोंदणी केल्याचा प्रकार प्रांताधिकारी जोगेंद्र कटयारे यांनी उघडकीस आणला. बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे कुणीकोनूर येथे तलाठी कार्यालयात वारसा हक्क नोंद केली आहे.

या संदर्भात चुकीची वारसा नोंद झाल्याबाबत गौरी विकास साखळकर व उषा विकास साखळकर (रा. मुंबई ) यांनी कटयारे यांच्याकडे अपील दाखल केले होते. यानंतर याबाबतची प्रांताधिकारी यांनी खतरजमा करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार तलाठी घाडगे यांनी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संशयित आरोपी लक्ष्मी सुब्रमंडल स्वामी यांनी राजेंद्र दिनकर साखळकर यांच्याशी बाज येथे २० एप्रिल २००६ रोजी विवाह झाला असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात केली आहे. सदरच्या विवाह नोंदणीस खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या कागदपत्राच्या आधारे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवले. विवाह नोंदणी प्रमाणपत्र आधारे कुणीकोनूर तलाठी कार्यालयात २७ सप्टेंबर २०१९ रोजी वारसा हक्क नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, साखळकर यांचे वारस गौरी साखळकर व उषा साखळकर यांनी जत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सदरची विवाह नोंदणी कागदपत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले. प्रांताधिकारी यांनी बनावट खोटी कागदपत्रे तयार करणारे व खोटे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश यांनी दिले होते. यानुसार तलाठी यांनी दोघावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खोटी कागदपत्रे शासनास सादर करून शासनाची दिशाभूल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रांताधिकारी यांनी केलेली ही तालुक्यातील तिसरी मोठी कारवाई आहे.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT