The arena ceremony is full of excitement
आटपाडी- येथील अंबाबाई मंदिर परिसरात मच्छिंद्रनाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला  Pudhari Photo
सांगली

आटपाडीमध्ये माऊली माऊलीच्या जयघोषात रिंगण सोहळा उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथे किल्ले मच्छिंद्रगडच्या जगदगुरू मच्छिंद्रनाथांच्या पालखीचा  रिंगण सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीने मोठया उत्साहात संपन्न झाला. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकऱ्यांसह आटपाडीकरांच्या मोठया उपस्थितीत आणि अमाप उत्साहात माऊली माऊलीच्या अखंड गजरात अश्वाने मैदानाला फेऱ्या मारल्या. हा नयनरम्य सोहळा ग्रामदैवत अंबाबाई मंदिरासमोरील मैदानात संपन्न झाला.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात गेल्या बारा वर्षांपासून आटपाडीची ग्रामदेवता अंबाबाई मंदिरासमोरील मैदानात हा रिंगण सोहळा आयोजित केला जातो. प्रथम उत्तरेश्वर मंदिर परिसरात रिंगण झाले. ही जागा अपुरी पडू लागल्याने अंबाबाई मंदिरासमोर हे रिंगण घेतले जाऊ लागले. या रिंगण  सोहळ्याला दरवर्षी मोठा प्रतिसाद लाभत आहे. तडवळे येथून निघालेला पालखी सोहळा दुपारी आटपाडीच्या साईमंदिर येथे पोहोचला. सायंकाळी पाच वाजता सातभाई विठोबा मंदिराजवळ पालखी सोहळ्याचे आटपाडीकर नागरिकांनी आणि माजी खासदार संजयकाका पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, कल्लेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप पाटील, प्रकाश दौंडे, जालिंदर चव्हाण, शिवाजी माळी, दादासाहेब पाटील, जयराम देशमुख, बाबुराव गुरव, बबलुशेठ गुरव आणि ग्रामस्थांनी स्वागत केले.

 पालखी सोहळा दिंडीचालक मल्हारी जवाहरे, रथचालक जयराम देशमुख, दादासो शेवाळे, चोपदार कृष्णात सुतार आणि वारकऱ्यांसह अंबाबाई मंदिर परिसरात दाखल झाला. मंदिरासमोरील मैदानात रिंगणाची तयारी झाली होती. माऊली-माऊली असा गजर करत महिला आणि पुरुष वारकऱ्यांनी मैदानाला फेऱ्या मारल्या. त्यानंतर अश्वाने मैदानाला फेरी मारून रिंगण पूर्ण केले. सायंकाळी पालखी सोहळा श्री कल्लेश्वर मंदिर आणि तांबडा मारुती मंदिर आणि आटपाडी शहर परिसरात विसावला. आटपाडी येथे घरोघरी नागरिकांनी वारकऱ्यांचा पाहुणचार केला. सकाळी माणगंगा साखर कारखाना मार्गे कौठूळी कडे प्रस्थान करणार आहे.

SCROLL FOR NEXT