सांगली : हप्ते थकल्याने न्यायालयाच्या आदेशान्वये फायनान्स कंपनीने सील केलेल्या मिळकतीचा बेकायदेशीररीत्या ताबा घेतल्याने पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आयसीआयसीआय होम फायनान्सचे रोहित अनिल माने यांनी प्रशांत राजाराम कदम, पद्मा राजाराम कदम, सुशांत राजाराम कांबळे, संजय विश्वनाथ मास्ते आणि शोभा संजय मास्ते (सर्व रा. अण्णा सतगोंडा पाटीलनगर, हनुमाननगर, सांगली) यांच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी, संशयितांनी आयसीआयसीआय होम फायनान्सकडून कर्ज घेतले होते. परंतु कर्जाचे हप्ते भरले नसल्याने आयसीआयसीआय फायनान्सने न्यायालयात धाव घेतली.
त्यानुसार न्यायालयाने कोर्ट कमिनशर नेमून संशयितांची अण्णा सतगोंडा पाटीलनगर येथील मिळकत सील केली. परंतु न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून संशयितांनी दि. 25 ऑगस्टरोजी सील तोडून मिळकतीचा बेकायदेशीररित्या ताबा घेतला. त्यामुळे फायनान्स कंपनीने त्यांच्याविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाचजणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.