Kharsundi temple area encroachment
विटा : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणे आठवड्याच्या आत दूर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिले आहेत. याबाबतची जनहित याचिका शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शेखर निचळ यांनी दाखल केली होती.
सांगली जिल्ह्यातील खरसुंडी (ता.आटपाडी) येथे श्री सिद्धनाथांचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी वर्षभरात या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. वर्षभरामध्ये होणाऱ्या दोन मोठ्या यात्रा आणि वार्षिक उत्सवात भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना आणि ग्रामस्थांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत. सध्या राज्य शासनाने या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा आणि निधी दिला आहे.
मात्र, अतिक्रमणामुळे विकास कामांना जागाच नसल्याने बहुतांश निधी अखर्चित राहतो, म्हणजे खर्च होत नाही. परिणामी भाविकांना निवास व्यवस्था, वाहतुक कोंडी, स्वच्छतागृह, वाहनतळ आणि गर्दी आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सद्यस्थितीला खरसुंडी येथे ग्रामपंचायत, देवस्थान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जवळपास १७५ जागांवर अतिक्रमणे आहेत. अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात वेळो वेळी मागणी आणि उपोषण करूनही कोणती ही कार्यवाही न झाल्याने शेखर निचळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर याबाबत २२ डिसेंबररोजी सुनावणी झाली. यावेळी या अतिक्रमणांबाबत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आठ आठवड्याच्या मुदतीत कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे नाथनगरी खरसुंडी अतिक्रमण मुक्त होऊन भाविकांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अनंत वडगाव कर यांनी काम पाहिले.