सांगली ः पुढारी वृत्तसेवा
हरिपूरसह परिसरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन सराईत चोरट्यांना जेरबंद करून 51 तोळे सोने व दीड किलो चांदीचे दागिने असा 38 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तौफिक सिकंदर जमादार (वय 31), दीपक पितांबर कांबळे (27, दोघेही रा. उमळवाड, ता. शिरोळ) आणि समीर धोंडिबा मुलाणी (31, रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
याबाबत माहिती अशी की, काही महिन्यांपासून शहर आणि ग्रामीण भागात चोरी, जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. हरिपूर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले आहेत. काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी निवृत्त अधिकार्याचा बंगला फोडून 44.5 तोळे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केले होते.
एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील संदीप नलावडे आणि अरुण पाटील यांना सोमवारी सकाळी जुना हरिपूर रस्ता परिसरात तिघेजण दुचाकीवरून (एमएच 09 ईएच 7110) चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने जुना हरिपूर रस्ता येथे सापळा लावला. काही वेळाने तौफिक, दीपक व समीर दुचाकीवरून जुना हरिपूर रस्ता येथे आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीस अडकवलेल्या पिशवीची तपासणी केली असता, त्यात सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. या दागिन्यांबाबत तिघांकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तौफिक जमादार, दीपक कांबळे यांनी साथीदार समीर मुलाणी याच्या दुचाकीवरून हरिपूर गावात सहा महिन्यांपासून बंद घरे फोडल्याची कबुली दिली. चोरीसाठी त्यांनी वारणाली परिसरातून दुचाकी चोरल्याचेही सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून 36 लाख 51 हजार रुपये किमतीचे 51 तोळे सोने, एक लाख 60 हजार रुपये किमतीची 1 किलो 665 ग्रॅम चांदी व मोटरसायकल असा 38 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील या तीन चोरट्यांनी हरिपूर परिसरात धुमाकूळ घातला होता. सहा महिन्यांपासून बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले. यात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच, संजयनगर आणि शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तौफिक जमादार, दीपक कांबळे हे दोघे मजुरीचे काम करतात, तर समीर मुलाणी हा मेकॅनिक आहे. तौफिक रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी चोरीचे, तर समीर मुलाणीवर सातारा जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.