विटा : पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्कचा 'सीएसआर' निधी पाटणच्या अगोदर खानापूरला देऊ, अशी घोषणा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. विट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन, आमदार अनिलभाऊ युवा मंच आणि मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार अनिलराव बाबर, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे, माजी नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, राज्य औषध निर्माण परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, सिनर्जी हॉस्पिटलचे प्रसाद जगताप आदी उपस्थित होते.
मंत्री देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले की, माझा आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा २००४ पासूनचा ऋणानुबंध आहे. आमदार बाबर यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केले आहे. त्यामुळे माझे ते ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. मुंबईत आमदार अनिल बाबर यांनी सामाजिक उपक्रमातून हा वाढदिवस साजरा करण्याची सूचना केली होती. त्यामुळे त्यांनी मागितलेला निधी पाटणच्या अगोदर खानापूर तालुक्याला दिला जाईल. अगोदरचे मुख्यमंत्री आम्हाला भेटत देखील नव्हते. उलट आम्ही केवळ दहा मिनिटांपूर्वी मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉल करूया. असे म्हटले आणि लगेच ते या सभेत बोलले. आमदार बाबर यांच्या दोन्ही मुलांनी अमोल आणि सुहास यांनी शिबिराचे केलेले नियोजन कौतुकास्पद आहे, असेही देसाई म्हणाले.
आमदार बाबर म्हणाले, आगामी काळात उपचाराविना मतदारसंघातील रूग्ण दगावला, अशी एकही केस होणार नाही. राज्याच्या धर्तीवर मतदारसंघातही आरोग्य मदत कक्ष उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. आमच्याही टीममध्ये एक मंगेश चिवटे तयार करू. तसेच एखाद्याचा कणा ताठ ठेवायचा असेल, तर गुडघा चांगला लागतो. त्यामुळे गुडघ्याच्या उपचारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळावा, अशी मागणी आमदार बाबर यांनी केली. त्यावर चिवटे यांनी गुडघे आणि खुब्याच्या उपचाराचा समावेश केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचे सांगितले.
चिवटे म्हणाले, आमदार बाबर यांची पुढची पिढीही तितकीच ताकदीने काम करीत आहे. तर विजय पाटील यांनी यापूर्वी संघटनेसाठी अनेक कामे केली आहेत. असेच सामाजिक उपक्रम यापुढेही राबविण्याच्या सूचनाही चिवटे यांनी केल्या.
या शिबिरात औषधोपचार मोफत होणार आहेत, पण शस्त्रक्रियासुद्धा मोफत करण्याचा मानस आहे. राजकारण करताना एखादे काम कमी जास्त होऊ शकते. मात्र, आरोग्य क्षेत्रात चांगले काम केल्याचे शंभर टक्के समाधान मिळते, असे सुहास बाबर यांनी यांनी सांगितले.
हेही वाचा :