मिरज : मिरज-टाकळी रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील आणि भाऊ असे तिघे गंभीर जखमी झाले. अनुष्का परशुराम म्हेत्रे (12, रा. चाणक्य चौक, कुपवाड) असे मृत मुलीचे नाव आहे. या अपघातात तिचे वडील परशुराम कल्लाप्पा म्हेत्रे (40), आई सावित्री परशुराम म्हेत्रे (32), भाऊ अथर्व परशुराम म्हेत्रे (14) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी राहुल नंदकिशोर भालेराव (24, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुपवाड येथील म्हेत्रे कुटुंबीय कामानिमित्त बेळंकी येथे गेले होते. सर्वजण दुचाकीवरून मिरजकडे परतत होते. यावेळी मिरजहून मल्लेवाडीकडे जाणार्या राहुल भालेराव याच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात अनुष्का हिचा मृत्यू झाला, तर तिच्या आई-वडिलांसह भाऊ गंभीर जखमी झाला.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. भरधाव वेगाने दुचाकी चालवून अपघात करून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी राहुल भालेराव यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.