

मिरज : मिरजेतील भाजी मंडईचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. गेल्या साडेपाच वर्षांपासून खंदकाच्या जागेत काम सुरू आहे. ठेकेदार युद्धपातळीवर काम करण्याच्या तयारीत असूनही महापालिकेच्या काही अधिकार्यांच्या अनास्थेमुळे हे काम संपलेले नाही. मात्र काम अंतिम टप्प्यात आले आहे. भाजी मंडईसाठी रस्ता मिळत नसल्याने, या मंडईसाठी कोणी रस्ता देता का रस्ता? असे म्हणण्याची वेळ मनपा अधिकार्यांवर आली आहे.
मिरजकरांच्या अनेक प्रश्नांपैकी भाजी मंडई हा एक प्रश्न. मिरजेच्या मार्केट व किल्ला भागात असणार्या खंदकातील सुमारे दोन एकर जागेवर 1979 मध्ये भाजी मार्केटचे आरक्षण पडले. तेव्हापासून या जागेवर भाजी मंडई बांधण्याची मागणी आहे. 1989 पासून या मागणीने जोर धरला. त्यानंतर या मागणीसाठी शहरामध्ये अनेक आंदोलने झाली. मार्केट परिसरातील पार्किंगचा प्रश्न, कन्या शाळेला होणारा त्रास, या परिसरातील व्यापार्यांना होणारा त्रास आणि भाजी विक्रेत्यांची गरज म्हणून येथे नव्या भाजी मंडईची गरज आहे. शहरातील विकास योजनेअंतर्गत खंदकातील या जागांवर आरक्षण क्रमांक 9 अंतर्गत आठवडा बाजाराचे आरक्षण ठेवण्यात आले होते. मात्र जागेवर जमीन मालकांची काही जुनी घरे अस्तित्वात असल्याने या आरक्षणाचा विकास करण्यात मोठी अडचण होती. त्यानंतर भाजी मंडईच्या आरक्षणाबाबतचा फेरबदलाचा प्रस्ताव 10 ऑक्टोबर 2008 ला शासनाला पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव डिसेंबर 2010 मध्ये राज्य शासनाने मंजूर केला. त्यामुळे खंदकातील जागा विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. 2010 मध्ये शासनाने प्रस्ताव मंजूर करूनही खंदकातील जागा वापराविना पडून राहिली. एकीकडे मार्केट परिसरामध्ये इतकी मोठी जागा वापराविना पडून आणि दुसरीकडे नव्या मार्केटची गरज असताना ही जागा विकसित केली जात नव्हती.
लक्ष्मी मार्केट येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयापासून दत्त मैदानापर्यंत भाजी विक्रेत्यांना गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयानेच भाजी विक्रीस बंदी घातली. मात्र त्यांना पर्यायी जागेची व्यवस्था नसल्याने विक्रेते अनेक वेळेस महापालिकेची कारवाई होऊनही याच ठिकाणी भाजी विक्रीस बसलेले असतात. शिवाय मार्केट परिसरामध्ये अन्यत्र अनेक ठिकाणी हातगाड्या लावलेल्या असतात. या विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी जागाच नसल्याने त्यांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून भाजी मंडईसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले. तो निधी महापालिकेकडे आला. ठेकेदाराकडून खंदकाच्या जागेवर तीनमजली इमारत बांधण्याचे कामही सुरू झाले होते. मात्र काम थांबले. काम बंद पडल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र पुन्हा काम सुरू झाले. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही महिन्यांत हे काम पूर्ण होईल. या कामासाठी रस्त्याचा प्रश्न आहेच. शिवाय मंडई पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या कामासाठी महापालिकेचे काही संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे हे काम पूर्ण झालेले नाही.