सांगली : शशिकांत शिंदे
सांगली जिल्ह्यातील बेदाण्याला आठ वर्षांपूर्वी जीआय मानांकन मिळाले. त्यामुळे गुणवत्तेचा बेदाणा निर्मिती होऊन द्राक्ष शेती व बेदाणा बाजारपेठेला आणखी चालना मिळेल असे वाटत होते. मात्र आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ 1830 शेतकर्यांनी जीआय मानांकनासाठी नोंदणी केली. त्यापैकी केवळ सात शेतकर्यांनी यावर्षी बेदाणा निर्मिती करून जीआय मानांकनाद्वारे त्याचे मार्केटिंग केले आहे. जिल्ह्यातून सुमारे दोन लाख तीस हजार टन बेदाणा निर्मिती होते. त्या तुलनेत जीआय मानांकनाचे प्रमाण अत्यल्प आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे सोमवारी सांगली जिल्हा दौर्यावर होते. तासगाव येथे झालेल्या द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यक्रमात त्यांनी गुणवत्तेच्या बेदाणा व द्राक्ष निर्मितीकडे लक्ष द्यायला हवे, असे परखड मत व्यक्त केले. जिल्ह्यात सुमारे 34 हजार हेक्टर क्षेत्रात द्राक्ष बागा आहेत. एक लाखावर शेतकरी द्राक्षाची शेती करीत आहेत. शिल्लक राहिलेल्या द्राक्षापासून बेदाणा तयार करण्यात येतो. त्याशिवाय खास बेदाण्यासाठी सुद्धा द्राक्षाची निर्मिती केली जाते.
साधारणत: पंचवीस हजार शेतकरी द्राक्षापासून बेदाणा तयार करतात. द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळले. जिल्ह्याच्या पूर्व भागातील वातावरण हे बेदाण्याला अनुकूल असल्याने गुणवत्तेचा बेदाणा तयार होऊ लागला. या बेदाण्याचे मार्केटिंग होण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेऊन आठ वर्षांपूर्वी सांगलीच्या बेदाण्याला जीआय मानांकन मिळवून घेतले. कृषी विभाग द्राक्ष बागायतदार संघ व बाजार समिती यांच्या पुढाकारातून जीआय मानांकनाबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील केवळ एक हजार आठशे तीस शेतकर्यांनी जीआय मानांकनासाठी नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र घेतले, मात्र या जीआय मानांकनाचा उपयोग शेतकरी फारसे करून घेत असल्याचे दिसत नाही. यावर्षी केवळ सात शेतकर्यांनी जीआय मानांकनानुसार 100 ते 125 टन बेदाण्याची विक्री केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेदाण्याची निर्मिती होते. परदेशात गुणवत्तेच्या मालाची मागणी आहे, मात्र गुणवत्तेचा बेदाणा तयार होत नाही. त्यामुळे केवळ दहा टक्के बेदाणा निर्यात होते. तोही बेदाणा कमी गुणवत्तेचा असून, तो मुख्यत: बेकरी उत्पादनासाठी निर्यात होतो.
जीआय मानांकनानुसार छोट्या शेतकर्यांनी गुणवत्तेचा बेदाणा निर्मिती करून त्याचे मार्केटिंग करणे अशक्य होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समित्या यासारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात गुणवत्तेचा बेदाणा तयार करून त्याचे मार्केटिंग करणे आवश्यक आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील द्राक्षे व बेदाणा बाजारपेठेला आणखी चालना मिळेल.- पी. एस. नागरगोजे, कृषी अधिकारी, कृषी विभाग, सांगली.