तासगाव, पुढारी वृत्तसेवा : गावात सौरऊर्जा प्रकल्प उभा करू द्यायचा की नाही या मुद्द्यावरून गव्हाण (ता. तासगाव) येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये घमासन सुरू आहे. बोगस ग्रामसभा घेऊन सौरऊर्जा प्रकल्पाला संमती दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या आवारात डिजिटल लावून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा निषेध करत रोष व्यक्त केला आहे. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेपुढे सरपंचांना नमते घ्यावे लागले. अखेरीस सरपंच हणमंत पाटील यांना लोकांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्यास भाग पाडले.
आक्रमक ग्रामस्थांसमोर सरपंचांचे नमते
सौरऊर्जा प्रकल्पावरून घमासान
बोगस ग्रामसभा घेतल्याचा आरोप
गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात लावलेल्या डिजिटल फलकावर म्हटले आहे, एक मे 2023 रोजी घेतलेल्या ग्रामसभेतील ग्रामस्थांच्या सह्या बोगस आहेत. बोगस ग्रामसभा दाखवून महावितरणचा सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी संमती दिली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच 26 जून 2024 रोजी ग्रामसभा घेऊन सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यास विरोध असल्याचाही ठराव घेण्यात आला. बोगस ग्रामसभेविषयी ग्रामस्थांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे तक्रार केली आहे. खाडे यांनी चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
दरम्यान, सोमवारी दुपारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन याबाबतचा जाब सरपंच पाटील यांना विचारला. यानंतर 26 जून 2024 च्या ग्रामसभेतील ठरावानुसार प्रकल्पास विरोध असल्याचे पत्र जिल्हाधिकार्यांना देण्याचा निर्णय झाला. तेवढ्यावर समाधान न झालेल्या आक्रमक ग्रामस्थांनी सरपंचांना ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्यास भाग पाडले.
डिजिटलवरील मजकुरात म्हटले आहे, गावातील 50 एकर जमीन केवळ एक रुपया दराने विकण्याचा घाट एकाने घातला आहे. एवढ्या कमी पैशात जमीन देऊन गावाचा काय फायदा होणार आहे हे कोणास माहीत नाही. हा घाट घालणारा गावच्या झारीतील शुक्राचार्य कोण आहे ? असा प्रश्न विचारला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बोगस सह्या करून 1 जून 2023 रोजी ग्रामसभा झाल्याचे कागद रंगवले आहेत. कर्मचार्यांंकडून याबाबतचा खुलासा मागविला आहे. तो प्राप्त होताच ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्णय घेणार आहे. बहुतांशी ग्रामस्थांच्या विरोधानंतर 26 जून 2024 रोजी ग्रामसभा घेऊन प्रकल्पास विरोधाचा ठराव घेतला आहे.- हणमंत पाटील, सरपंच, गव्हाण.