सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व कुपवाड पोलिसांनी थरारक पाठलाग करुन गांजा तस्काराचे मुसक्या आवळल्या.  Pudhari
सांगली

Sangli Ganja Seized | कुपवाड येथे थरारक पाठलाग करीत ४२ लाखांचा गांजा जप्त; बारामतीतील तस्कराला अटक

सांगली स्थानिक गुन्हे शाखा व कुपवाड पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Baramati drug smuggler arrested

कुपवाड : विना नंबरच्या कारमधून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराचा सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व कुपवाड पोलिसांनी थरारक पाठलाग करुन मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी कार व ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा अंदाजे १३४ किलो गांजा जप्त केला. विकी विजय कांबळे (वय ३२, रा.भीमनगर पिंपरी रोड,जाळोची ता. बारामती) असे अटक केलेल्या गांजा तस्काराचे नाव आहे.

सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांना बुधवारी माहिती मिळाली की, बारामती येथील एक जण पांढऱ्या रंगाच्या नंबर नसलेल्या कार मधून सांगलीत गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला होता. बुधवारी सायंकाळी एक पांढऱ्या रंगाची नंबर नसलेली कार भरधाव वेगाने कवलापूर, माधवनगर मार्गे अहिल्यानगरकडे गेली. एलसीबीचे पथक त्या कारचा पाठलाग करीत होते. यावेळी कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे हे अहिल्यानगर भागात गस्तीवर होते.

अहिल्यानगर मधून नंबर नसलेली कार भरधाव वेगाने संजयनगरकडे जात असल्याचे घाडगे यांना दिसताच त्यांनी कारचा पाठलाग केला.पोलिस पाठलाग करीत असल्याचे दिसून येताच कार चालकाने पोलिसांना चकवा देऊन पोलिस वाहनाला धडक दिली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक घाडगे हे किरकोळ जखमी झाले. भरधाव कार कुपवाड शहरातून एमआयडीसीकडे जात असताना पोलिसांनी पाठलाग करून कार चालकावर ताबा मिळवला.

पोलिसांनी कार चालकाला कुपवाड पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने विकी कांबळे असे नाव सांगितले.

संशयित विकी कांबळे याने बारामती येथील चंदनसिंग याच्या सांगण्यावरून चंदनसिंह याच्या पत्नीकडून गांजा खरेदीसाठी ४ लाख ३० हजार रुपये घेतले. चंदनसिंह यांची कार (एम एच ०२,सी झेड -- ०३०२) घेऊन कांबळे एकटाच ओडिसा राज्यातील बर्गट (जि. संभलपूर) येथे जाऊन जॉकी (पूर्ण नाव माहित नाही) त्याच्याकडून अंदाजे १३४ किलो वजनाचा तयार गांजा खरेदी करून चंदनसिंह याच्या सांगण्यावरून सांगली शहराजवळील हरिपूर येथील पप्पू फाकडे याला विक्री करण्यासाठी आला होता, अशी कबुली संशयित विकी कांबळे याने पोलिसांना दिली.

संशयित कांबळे याने गुन्ह्यात वापरलेली कार व अंदाजे किंमत ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा १३४ किलो गांजा जप्त केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे तपास करीत आहेत. गांजा प्रकरणी बडा मासा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT