Pandharpur Shree Vitthal Temple
पंढरपूरमध्ये भाविकांना मिळणार भोजन  Pudhari News Network
सांगली

पंढरपुरात आलेल्या भाविकांना पोटभर जेवण

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : सुरेश गायकवाड

आषाढी यात्रेसाठी आलेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांसह शेकडो पालख्या आणि दिंड्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे, त्यामुळे दर्शनासाठी गर्दी वाढत आहे. दशमी, एकादशी व द्वादशीला लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुुरात दाखल झालेले असतात. हे भाविक भुकेले राहू नयेत, त्यांना भोजन मिळावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोफत अन्नदान करण्यात येत आहे, तर मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत अन्नदान, तर स्वयंसेवी संस्थांच्या वतीनेही मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे देवाच्या दारात कुणीही भुकेला राहणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

आषाढी यात्रा सुरू असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत भाविक मोठ्या संख्येने उभे आहेत. या दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीमार्फत शुद्ध पिण्याचे पाणी, चहा व खिचडी वाटप करण्यात येत आहे. यात भाविकांना गोड बुंदी, खारी बुंदी, एकादशीला शाबुदाणा खिचडी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. खिचडी तयार करण्याचे काम श्री संत गजानन महाराज मठ अकोला ही स्वयंसेवी संस्था करत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत तासन् तास भाविक उभे राहतात. या भाविकांना जेवणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मंदिर समितीकडून दर्शन रांगेत 13 ते 21 जुलैपर्यंत 24 तास मोफत खिचडी वाटप करण्यात येत आहे. याचा लाभ लाखो भाविक घेत असून, समाधानही व्यक्त करत आहेत. दासोहरत्न चक्रवती दानेश्वर महाराज, श्री बसवगोपाल नीलमाणिक मठ बंडिगणी मठ बागलकोट (कर्नाटक) या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने दर्शन रांगेतील पत्राशेड येथे 24 तास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पंचपक्वान्न

मुख्यमंत्र्यांकडून जास्तीत जास्त भाविकांना भोजनाचा लाभ मिळावा यासाठी या आषाढी वारीत चंद्रभागा बसस्थानक, पालखी मार्गावर व नवीन भक्त निवासासमोर अन्नदान केंद्र उभारण्यात आले आहे. 16 ते 18 जुलैपर्यंत हे मोफत भोजन वाटप होणार आहे. यात पाणी बाटली, सरबत बाटली आणि पंचपक्वान्न भोजन देण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT