वसंतदादा बॅंक Pudhari Photo
सांगली

वसंतदादा बँकेतील ठेव रकमेसाठी पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

वसंतदादा शेतकरी सहकारी बँक अवसायकांच्या जाहीर निवेदनानुसार महापालिकेची बँकेतील ठेव व त्यावरील व्याज रकमेची मागणी करण्यात येत आहे. ठेव रकमेच्या मागणीसाठी अटी, शर्ती कळवाव्यात, असे पत्र अवसायकांना पाठवले आहे. बँकेत अडकलेल्या रकमेसाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठेवींच्या रकमा वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत गुंतवण्यात आलेल्या होत्या व आहेत. त्या सर्व ठेवींचा तपशील बँकेकडे उपलब्ध आहे. रकमेच्या वसुलीसाठी महापालिकेने दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात अपिल केले होते. महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठेवींची रक्कम लवकरात लवकर अदा केली जाईल, असे आश्वासनवजा कथन बँक अवसायकांतर्फे वकिलांनी केले होते. त्याआधारे उच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात तसा उल्लेख करुन अपिल निकाली काढले. मात्र बँकेने महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठेवींची व्याजासहित रक्कम देण्याबाबत कोणतीच पूर्तता केली नाही. त्यामुळे महानगरपालिकेने वकिलांमार्फत नोटीस पाठविली. मात्र त्यासही आजअखेर कोणतेही उत्तर दिलेले नाही. बँकेकडे ठेव व व्याजासह 356.22 कोटी रुपये येणेबाकी असल्याकडे आयुक्तांनी अवसायकांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, अवसायकांनी जाहीर निवेदन दिलेले आहे. त्यानुसार 1 डिसेंबर 2024 पूर्वी महापालिकेच्यावतीने अवसायकांकडे ठेवीच्या रकमेचा क्लेम सादर केला जाणार आहे. क्लेम सादर करण्यापूर्वी क्लेमच्या शर्ती व अटी महापालिकेस कळवाव्यात, असे पत्र बँकेच्या अवसायकांना पाठवले आहे, अशी माहिती आयुक्त गुप्ता यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT