सुहास बाबर, राजेंद्र अण्णा देशमुख व वैभव पाटील 
सांगली

खानापुरात अखेर तिरंगी लढत

Maharashtra Assembly Election : सुहास बाबर, वैभव पाटील, राजेंद्रअण्णा रिंगणात; ब्रह्मानंद यांची माघार

पुढारी वृत्तसेवा

विटा/आटपाडी : खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 30 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले होते. छाननीत दोन अर्ज अवैध, तर 28 उमेदवारांचे 35 अर्ज वैध ठरले होते. सोमवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत तब्बल 14 जणांनी माघार घेतली, त्यामुळे 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील आणि अपक्ष राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. या मुदतीच्या अंतिमक्षणी महायुतीचे बंडखोर उमेदवार ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु महाविकास आघाडीचे बंडखोर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी हे तीनही उमेदवार महायुतीच्या शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या तीन घटकपक्षांत एकत्र होते. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना अधिकृत उमेदवारी मिळणार, हे स्पष्ट होताच वैभव पाटील आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांनी थेट महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. काही दिवसांपासून महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्याविरोधात एकास एक लढत देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते, तर ब्रह्मानंद पडळकर यांनी भाजपमधूनच सुहास बाबर यांच्याविरोधात अपक्ष उभारायचे, असे ठरविले होते. मात्र महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. परंतु त्यानंतरही एकच उमेदवार विरोधात राहावा, यासाठी पक्षीय आणि व्यक्तिगत पातळीवर बरेच प्रयत्न झाले.

भाजपने जतमध्ये गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्याने ब्रह्मानंद पडळकर यांचा अर्ज निघणार, हे स्पष्ट झाले होते. परंतु ब्रह्मानंद पडळकर यांनी काहीशी ताठर भूमिका घेतल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज राहील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेरच्याक्षणी ब्रह्मानंद पडळकर यांनी अपक्ष अर्ज मागे घेतल्याने महायुतीला काहीसा दिलासा मिळाला. परंतु देशमुख आणि पाटील यांच्यामध्ये शेवटपर्यंत समेट न झाल्याने महाआघाडीत बंडखोरी कायम राहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT