Fear of leopards increased in Sonhira valley
सोनहिरा खोर्‍यात वाढली बिबट्यांची दहशत Pudhari File Photo
सांगली

सोनहिरा खोर्‍यात वाढली बिबट्यांची दहशत

पुढारी वृत्तसेवा

देवराष्ट्रे, पुढारी वृत्तसेवा : कडेगाव तालुक्यामध्ये सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात जवळपास साडेतीन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन झाले होते. यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर बिबट्याचे गांभीर्य वन विभागासह प्रशासनाने म्हणावे तसे घेतले नव्हते. आता मात्र अभयारण्याच्या लगतच्या भागात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचा अंदाच वर्तवला जात आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्या दिसून येत आहे. तर काही गावात पाळीव कुत्र्यांसह प्राण्यांवर हल्ले झाल्याचे दिसून आले आहे.

साधारण 2001-02 मध्ये जुन्नर विभागात बिबट्याच्या समस्येने लोक हैराण झाले होते. यामध्ये तब्बल अकरा लोकांचा बळी गेला होता. तर काही लोक गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष समोर आला होता. सोनहिरा खोर्‍यात अथवा कडेगाव तालुक्यामध्ये या अगोदर कधीही बिबट्याचा विषय चर्चेत नव्हता. मात्र ऑक्टोबर 2020 मध्ये सागरेश्वर अभयारण्यात पहिल्यांदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर बिबट्याचा विषय चर्चेत आला. साडेतीन वर्षांत या परिसरात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा परिसर बिबट्यांच्या प्रजननासाठी पोषक आहे. सोनहिरा खोर्‍यामध्ये ताकारी योजनेचे पाणी फिरल्यापासून हा परिसर हिरवागार झाला आहे. परिसरात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सागरेश्वर अभयारण्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरात बिबट्याला पोषक खाद्य व लपण्यास मुबलक जागा असल्याने बिबट्यांची संख्या वाढत असल्याचा अंदाज आहे.

सुरुवातीच्या कालावधीत बिबट्याचा कोणालाच काही त्रास नव्हता. मात्र आता बिबट्याने पाळीव कुत्री, जनावरे यांना आपले भक्ष्य बनवल्याचे दिसत आहे. तसेच दररोज या ना त्या गावात बिबट्याचे दर्शन होत आहे. अद्याप या परिसरात कोठेही माणसावर हल्ला झाल्याचे दिसून आले नसले तरी पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. या परिसरामध्ये शेतामध्ये अनेक वस्त्या आहेत. जनावरांचे गोठे आहेत. त्यामुळे माणसांचा वावर रात्रंदिवस असतो. अशा परिस्थितीत बिबट्याचे सातत्याने होणारे दर्शन, धोक्याची घंटा तर नाही ना? असा प्रश्न येथील शेतकर्‍यांतून विचारला जात आहे. सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी प्रश्न उपस्थित करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

वन विभागाला गांभीर्य कधी येणार?

सुरुवातीला एक असलेला बिबट्या, त्यानंतर दोन पिल्लांसह दिसलेला मादी बिबट्या आणि आता तर अनेक ठिकाणी बिबट्या दिसून येत आहेत. देवराष्ट्रे, शिरगाव परिसरात बिबट्याचा पाळीव कुत्रे, वानर यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा झाल्या आहेत. मात्र आता आसद येथे रेडकावर हल्ला करून बिबट्याने ते ठार केले आहे. या भागात बिबट्या आल्यापासून येथील नागरिक व शेतकर्‍यांतून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आता तरी वन विभागाला गांभीर्य येणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT