

नांदुरी : पुढारी वृत्तसेवा : कळवण तालुक्यातील दरेगाव वणी शिवारात पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने अथक परिश्रमांनंतर बाहेर काढत जीवदान दिले. शेतकरी सोमनाथ राऊत यांच्या शेतात पाणी साठवणीसाठी सुमारे 15 फूट खोल पाण्याची टाकी तयार केलेली आहे. त्यात कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात रविवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास बिबट्या पडला.
याबाबत जवळच असलेले शेतकरी सुरेश गवळी यांना टाकीत कोणी तरी पडल्याचा अंदाज आल्यावर त्यांनी जाऊन पाहिले असता, त्यांना बिबट्याने आंब्याच्या झाडावर बसलेल्या 8-10 कोंबड्या फस्त करून शिकार करताना टाकीत पडल्याचे लक्षात आले. त्यावर गवळी यांनी तत्काळ नाशिक येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळवली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने धाव घेत मदत कार्य सुरू केले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला इंजेक्शनद्वारे भूल देऊन बाहेर काढले. दरम्यान, यात बिबट्या किरकोळ जखमी झाल्याचे निदर्शनास आले असून, उपचारानंतर त्याला सुरक्षित अधिवासात सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.