विटा : "आता बास, आता याच्या पुढं जाऊ नकोस" , "हो,पप्पा ! पण आधी तुम्ही फोटो काढा बघू" असे म्हणताच, पप्पांनी आपल्या मोबाईलवर मुलाचा फोटो घेतला आणि वळून पत्नीकडे जाऊ लागताच एक मोठी लाट आली. पप्पांनी मुलाच्या दिशेने तोंड करून पाहू लागताच अचानक लाट मुलास ओढून घेऊन गेली. काही क्षणात पुन्हा दुसरी लाट आली आणि बेशुद्ध अवस्थेतील मुलास बाहेर फेकले. वडील ओरडले, आईने हंबरडा फोडला, बहिण किंचाळली. लाईफ गार्डस धावत आले, त्यांनी छातीला पंपिंग करण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना शनिवारी (दि.१७) सायंकाळी रत्नागिरीच्या समुद्र किनारी घडली. या घटनेला ३० तास उलटताच वडिलाचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. ही हकिकत आहे, विट्याच्या दुर्दैवी फासे कुटुंबाची ! (Sangli News)
विट्याचे सुपुत्र आणि वसई - विरार महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी विनायक सुरेश फासे (वय ४५) यांचे आज (दि.१९) पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांचा १९ वर्षीय मुलगा सिद्धार्थ याचा रत्नागिरी च्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. तरुण मुलगा अनपेक्षितपणे सोडून गेल्याचा धक्का विनायक फासे यांना सहन झाला नाही. केवळ काही तासांत पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. (Sangli News)
विनायक फासे हे वसई विरार महापालिकेत वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. शनिवारी कुटुंबासह रत्नागिरी येथे गेले असता समुद्रकिनारी त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा अचानक आलेल्या लाटेमुळे स्वतःला सावरू शकला नाही आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. आपल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण त्याचे प्राण वाचवू शकलो नाही, ही खंत रविवारी दिवसभर विनायक यांना लागून राहिली होती. अनेक लोक भेटून सांत्वन करीत होते. पण ते केवळ झालेली घटना पुनः पुन्हा सर्वांना सांगत होते. मात्र, ते रडत नव्हते. काहींनी त्यांना रडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते विमनस्क अवस्थेत होते. (Sangli News)
रात्री त्यांना विषय बदलून अनेकांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते पुत्र विरहाने शोकमग्न होते. अखेर आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सिद्धार्थ हा अत्यंत हुशार होता. तर विनायक फासे हे अत्यंत मितभाषी व हरहुन्नरी असे अधिकारी होते. विनायक फासे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. फासे कुटुंबावर अचानक असा दु:खाचा डोंगर कोसळल्याने शहरवासीयांत हळहळ व्यक्त केली जात होती.