विटा - नायब तहसीलदार निलेश भोसले यांना निवेदन देताना भाळवणीचे विठ्ठल धनवडे, प्रकाश निकम, बाळकृष्ण निकम, जयसिंग निकम, कॉम्रेड सुभाषबापू पाटील, किसनराव जानकर, बाबासाहेब मुळीक  Pudhari
सांगली

Shaktipeeth Highway Protest | शक्तिपीठ' ला भाळवणीकरांचा तीव्र विरोध : तहसीलदारांना निवेदन

शक्तिपीठ महा मार्गाविरोधात खानापूर तालुक्यातील भाळवणी ग्रामस्थांचा आणि शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

पुढारी वृत्तसेवा

Bhalwani Farmers Agitation on Shaktipeeth Highway

विटा : प्रस्तावित शक्तिपीठ महा मार्गाला खानापूर तालुक्यातील भाळवणीच्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र विरोध दर्शविला आहे. या महामार्गामुळे गावातील सुपीक बागायती जमीन बाधित होणार असल्याने हा महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन भाळवणी येथील सर्व शेतकऱ्यांच्यावतीने विटा तहसीलदार यांना देण्यात आले.

या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, भाळवणी गावच्या हद्दीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून यामध्ये मुल्लानगर ते येरळा नदीकाठ या भागातील सुमारे २०० ते २५० एकर सुपीक बागायती जमीन संपादित केली जाणार आहे. ही जमीन अत्यंत सुपीक आणि बारमाही पाण्याच्या सोयीची असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शेती हाच या भागातील लोकांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे. जर या जमिनी महामार्गासाठी घेतल्या गेल्या, तर शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होतील आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

वाढती महागाई, खतांचे वाढलेले दर आणि मुलांचे शिक्षण यांसारख्या समस्यांनी शेतकरी आधीच संकटात असताना, आता जमिनी जाण्याच्या भीतीने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या प्रकल्पामध्ये केवळ जमिनीच नव्हे, तर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल, घरे आणि शेततळीदेखील जाणार आहेत. यामुळे शिल्लक राहिलेल्या जमिनीत शेती करणेही अशक्य होणार आहे.

भाळवणी ग्रामपंचायतीने यापूर्वीच ग्रामसभा घेऊन या महामार्गाला एकमताने विरोध करण्याचा ठराव मंजूर केला आहे. तरी शासनाने शेतकरी हिताचा विचार करून शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, तालुकाध्यक्ष किसनराव जानकर, शेकापचे जिल्हा संघटक कॉ. सुभाष बापू पाटील, विठ्ठल धनवडे, प्रकाश निकम, बाळकृष्ण निकम, जयसिंग निकम, अशोक भगत, शिवाजी निकम, अक्षय निकम यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT