Oil 
सांगली

Edible Oil Price Hike | सणासुदीत तेलाच्या दरवाढीचा तडका

किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढ; सोयाबीन, सरकी तेलाची मागणी वाढली

पुढारी वृत्तसेवा

सांगली : मृणाल वष्ट

बाजारात खाद्यतेलला मागणी सतत वाढत आह आणि मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने तेलदरात वाढ होत आहे. गेल्या दहा दिवसात तेलदरात डब्यामागे १०० रुपयांनी वाढ झाली. गतवर्षीपेक्षा यावर्षी डब्यामागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तेलदरात आणखी १०० रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता तेल व्यापारी व्यक्त करत आहेत.

सगळ्याच तेलांच्या दरात या सप्ताहात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात सोयाबीन आणि सरकी तेलाला सर्वाधिक मागणी आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे आगामी काळात आणखी १०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता तेल विक्रेत्यांनी वर्तवली आहे राज्यात पावसाने ओढ दिल्याने तेलबियांच्या पिकांवर विपरित परिणाम होणार आहे. तेलबियांचे उत्पादन घटल्यास स्थानिक पातळीवर होणारी तेलनिर्मितीही घटणार आहे. आता तेलदराची वाटचाल २०० रुपये लिटरच्या दिशेने सुरू झाली आहे. नोव्हेंबरमध्ये दरात वाढ होण्याचा इशाराही तेल व्यापाऱ्यांनी दिला आहे.

खाद्यतेलाशिवाय दिवाळी साजरी होऊच शकत नाही. त्यामुळे किराणा सामानात तेलाचा खर्च सर्वाधिक असूनही त्याची मागणी वाढणारच आहे. काटकसर करून जेमतेम एक लिटरभर तेलच कमी करता येऊ शकते. चार ते पाच जणांच्या कुटुंबाला महिन्याला किमान सात लिटर खाद्यतेल लागते. दिवाळीत आणखी किमान ४ किलो तेल अधिक खरेदी होते. तळण्याचे पदार्थ करताना तेलाचा वापर अधिक होतो. सांगली जिल्ह्यात रोज अंदाजे १५० टन तेलाची उलाढाल होते. दिवाळी जवळ आल्यामुळे तेलाचा वापर कमी करणे शक्यच नाही. त्यामुळे परवडत असो अगर नसो तेलाला पर्याय नाही. सरकी, सोयाबीन तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे.

आता पुन्हा रशिया युक्रेन, अमेरिका-ईराण यांच्यातील युध्दजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे तेलदरातही सतत वाढ होत आहे. विशेष म्हणजे गतवर्षी व यावर्षी सूर्यफूल तेलदर स्थिर आहे

दरवाढीच्या भीतीने तेल खरेदी लवकर

गृहिणींचे दिवाळीसाठीचे नियोजन आतापासूनच सुरू झाले आहे. कच्चा माल खरेदी करून ते निवडणे, पाखडणे, दळण आणि पूर्वतयारीसाठीचे नियोजन सुरू झालो आहे. तेलदर वाढत असल्याने आधी तेलखरेदी करण्याकडे गृहिणींचा ओढा आहे. पुढील महिन्यात दरवाढ झाली तर त्याची खरेदी कमी करावी लागेल या भीतीने तेल खरेदी या महिन्यातच सुरू झाली आहे.

खाद्यतेलात किलोमागे १० ते १५ आणि डब्यामागे १०० रुपये वाढ होणार. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला चांगली मागणी आहे. तुटवड्यामुळे दरात तेजी राहणार आहे. मागणी जास्त आणि पुरवठा होण्यात कमतरता असल्याने तुटवडा अधिक आहे.
आदर्श हुक्किरे, तेल व्यापारी, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT