

सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांचा दुष्काळाच्या कक्षेत समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि जत या चार तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’मध्ये समावेश करण्यात आला होता. आता ‘ट्रिगर-२’मध्ये उर्वरित शिराळा, वाळवा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या सहा तालुक्यांचाही समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळी उपाययोजना व सवलती लागू होणार आहेत.
या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती यांसह १२ सवलती व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी या सवलतींचा समावेश आहे.
तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत कामांचे निकष शिथिल करून अधिकाधिक कामे सुरू करणे, गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावांतील कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करणे, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू न देणे, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे आणि पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचे नियोजन करणे, या उपाययोजनाही राबविण्यात येणार आहेत.