Sangli Crime News
सांगली : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ट्रकचोरीचा बनाव करणार्‍या दोघांना ताब्यात घेऊन दोन ट्रक जप्त केले.  Pudhari Photo
सांगली

फायनान्सचे हप्ते थकल्याने रचला ट्रकचोरीचा बनाव

पुढारी वृत्तसेवा

फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्याने ट्रक चोरीला गेल्याचा बनाव करणार्‍यासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. बिरदेव बाळू गडदे (वय 26, रा. गौंडवाडी, गडदे वस्ती, ता. सांगोला, जि. सोलापूर) व गणेश अनिल भोसले (वय 32, रा. रमामातानगर, काळे प्लॉट, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी चोरीस गेलेल्या ट्रकसह दोन ट्रक जप्त केले आहेत.

चोरीचा बनाव केलेला ट्रक संशयित बिरदेव याचे चुलते यशवंत गडदे यांच्या नावावर होता. यशवंत गडदे यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात ट्रक चोरीची फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकातील संकेत मगदूम, अमोल ऐदाळे व सोमनाथ गुंडे यांना, चोरीस गेलेला ट्रक विश्रामबाग येथील ट्रक अड्ड्यामध्ये पार्क करण्यात आला असून तिथे दोघे संशयित असल्याची माहिती मिळाली. पंकज पवार व पथकाने विश्रामबाग अड्डा येथे धाव घेत तपासणी केली. यावेळी एका ट्रकच्या नंबरप्लेटला काळे फसल्याचे आढळून आले. तिथे बिरदेव गडदे व गणेश भोसले थांबले होते. पथकाने दोघांना ताब्यात घेऊन नंबरप्लेटला काळे फासल्याबद्दल विचारणा केली. यावेळी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता, बिरदेव गडदे याने चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली.

बिरदेव गडदे याला फायनान्स कंपनीकडून ट्रक घेण्यासाठी कर्ज मिळत नव्हते. त्याने चुलते यशवंत गडदे यांच्या नावावर फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रक (एमएच 50, 4875) खरेदी केला आणि तो स्वतःच वापरत होता. काही महिन्यानंतर फायनान्स कंपनीचे कर्ज थकित गेले. हप्ते भरण्यासाठी पैसे नसल्याने बिरदेव याने गणेश भोसलेच्या मदतीने चुलत्याच्या नावावरील ट्रक सांगोला येथील मोहन शेंबडे यांना विकला. त्यानंतर गणेश भोसले याच्या मालकीच्या ट्रकला (एमएस 10, झेड 4584) विकलेल्या ट्रकची नंबरप्लेट लावली. बनावट नंबरप्लेट लावलेला ट्रक मिरज - पंढरपूर रस्त्यावरील एका ढाब्याजवळ काही काळ उभा केला. त्यानंतर हा ट्रक विश्रामबाग अड्डा येथे आणण्यात आला. चुलते यशवंत गडदे यांना बिरदेव याने ट्रक चोरीला गेल्याचे सांगून मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास लावली.

SCROLL FOR NEXT